Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरकरांनो उष्णतेची लाट असताना काय काळजी घ्यायची?

 सोलापूरकरांनो उष्णतेची लाट असताना काय काळजी घ्यायची?


मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला 14 ते 16 मार्चच्या तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. सोलापूर, विदर्भ, खानदेश,  नांदेड, परभणीसह मुंबई परिसरात तसंच पणजीमध्येही गेल्या दोन दिवसांपासून पारा नेहमीपेक्षा जास्त वर चढताना दिसतोय.उष्णतेची लाट पाहता गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं, उन्हात फिरणं टाळावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.गेल्या आठवड्यात नाशिक, पुणे परिसरात पावसाच्या सरीही कोसळल्या. मार्चमध्ये वातावरणात असे चढउतार आढळून येणं नवीन नाही. अशा वातावरणात उष्माघात होऊ शकतो, म्हणून काळजी घ्यावी असं तज्ज्ञांनी म्हटलंय.


उष्माघात म्हणजे काय?

कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं. ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर्स सांगतात.बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातील थर्मोरेग्यूलेशन बिघडते, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू होऊ शकतो असं आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात.सागरी किनारपट्टीजवळील जिल्ह्यांमध्ये मात्र उष्माघाताचा धोका कमी असतो असं भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.ते म्हणाले, "16 मार्चपर्यंत मुंबई, ठाणे, कोकण आणि पालघर भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. किनारपट्टीजवळील क्षेत्रात उष्माघाताचा धोका कमी असतो कारण 50-60 टक्के आद्रता या परिसरात असते. जिथे कोरडा उन्हाळा असतो शा ठिकाणी उष्माघाताचा धोका अधिक असतो."यापूर्वीही महाराष्ट्रासह देशभरात उष्माघातामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात विशेषत: नागपूर, मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात.राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, अशा काही उष्ण राज्यांमध्येही उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ नागरिकांना सोसावी लागते.जून 2021 मध्ये कॅनडात रेकॉर्डब्रेक उष्णता वाढल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. उष्णतेची लाट आल्याने आणि अनेक शहरांमध्ये पारा 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झाला होता.


एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय करावं?

लोकांनी घाबरू नये, पण काळजी घ्यावी असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. उष्णतेची लाट पाहता आवश्यक नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळा असं आवाहन हवामान खात्याने आणि मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सरीता पिकळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दर तीन ते चार तासाने लघवीला जाणं आवश्यक आहे, त्यासाठी तेवढं पाणी शरीरात जायला हवं. लघवीचा रंग गडद पीवळा असल्यास शरीरात पाण्याची कमतरता आहे असे समजावे."उष्णतेच्या लाटेमुळे डोकेदुखी, थकवा तसंच सतत झोप येणं ही लक्षणं सुद्धा दिसतात असंही त्या म्हणाल्या.


उष्माघाताची लक्षणं

चक्कर येणे, उल्ट्या होणं, मळमळ होणे.शरीराचे तापमान जास्त वाढणे.पोटात कळ येणे.शरीरातील पाणी कमी होणे.ही लक्षणं आढळल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत मुंबई महानगरपालिकेनेही काही सूचना केल्या आहेत.तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.दरम्यानच्या काळात, त्याला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं.ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या.त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.


मार्चमध्ये मुंबईत सर्वाधिक तापमान

साधारणपणे मार्च महिन्यात मुंबई आणि परिसरात नेहमीच तापमान इतकं वाढतं. गेल्या वर्षी, 27 मार्च 2021 रोजी मुंबईत 40.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. 28 मार्च 1956 रोजी तर मुंबईत 41.7 डिग्री तापमान नोंदवण्यात आलं होतं. हे मार्चमधलं मुंबईत नोंदवलेलं सर्वाधिक तापमान आहे.गेल्या दहा वर्षांत मार्च महिन्यातील किमान तापमान 38 ते 40 डिग्रींच्या आसपास असल्याचं हवामानखात्याची नोंद सांगते.


काय काळजी घ्याल?

तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरिरावर होऊ शकतात. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली ही तापमानवाढ सहन करता येऊ शकते. पण नवजात बालकं, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा वातावरणात आपण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.के. एस. होसाळीकर यांच्या मते, उष्णतेची लाट आल्यानंतर आपण थेट ऊन्हाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा.शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं. तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.ORS, लिंबू सरबत, तांदळाची पेज, ताक आदी पेय पिता येऊ शकतात.चहा-कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ते टाळायला हवेत.

Reactions

Post a Comment

0 Comments