कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील पालक गमावलेल्या बालकांना व त्यांच्या कुटुंबांना आवश्यक सुविधा तसेच सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रत्येक विभागाने प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या कोविड-१९ मुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दल समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, पर्यवेक्षण अधिकारी दीपक धायगुडे उपस्थित होते. कोविड-१९ मुळे जिल्ह्यात विधवा झालेल्या महिलांना मिशन वात्सल्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ व विधवा निवृत्ती वेतन आदी शासकीय योजनांचा लाभ मंजूर करुन देण्याबाबत कार्यवाही करावी. यासाठी संबधित तहसिलदार कार्यालयाकडे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्राधान्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा करावा. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठीही तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या. ज्या मुलांना पालक नाहीत अशा निराश्रीत बालकांना निवाऱ्यासाठी महानगरपालिका, संबंधित नगरपालिकेने निवारागृह उभारावी, अशा सूचनांही त्यांनी दिल्या. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एक पालक गमावलेले बालके १०८४ असून दोन्ही पालक गमावलेले बालके ४१ असे एकूण ११२५ बालके आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या ४१ बालकांपैकी ४० बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. तर ३७ अनाथ बालकांच्या पालकाना ५० हजारांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून १७ अनाथ बालकांच्या नावे ५ लाखांची मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ मुळे जिल्ह्यात विधवा झालेल्या १८२८ महिला असून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी यावेळी सांगितले.
0 Comments