विठ्ठल भक्तांना ठाकरे सरकारची खुशखबर, पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला मिळणार 700 वर्षापूर्वीचे स्वरूप
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर कसे असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली असताना आता ठाकरे सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात 73 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
देशभरातील लाखो विठ्ठल भक्तांना पुरातन विठ्ठल मंदिर येत्या काळात पाहता येणार आहे. पुरातत्व विभागाने बनविलेल्या विकास आराखड्याला मंदिर समितीने मंजुरी देत राज्य शासनाकडे पाठवला होता. यासाठी प्रमुख निधीची अडचण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूर करत यासाठी भरभरून निधीची तरतूद केल्याने विठ्ठल भक्तांसाठी ठाकरे सरकारची ही अनोखी भेट ठरणार आहे.
विधानपरिषदेच्या सभापती निलमताई गोऱ्हे यांनी यासाठी मुंबई आणि पंढरपुरात खास बैठक घेऊन मंजुरीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे . गेल्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी विठुरायाची महापूजा केल्यानंतर या आराखड्यास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते . आपल्या ठाकरी बाण्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अधिवेशनात या आराखड्याला थेट निधी उपलब्ध करून देत वारकरी संप्रदायाला खुशखबर दिली आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली येत्या पाच वर्षात या आराखड्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
विठ्ठल मंदिर हे 11 व्या शतकातील असल्याचे अभ्यासक मनात असले तरी त्याही पूर्वीपासून विठुरायाचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. आता पुन्हा 700 वर्षापूर्वीचे मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा बनविला असून पुरातत्व विभागाने गेल्या दोन वर्षांपासून हा आराखडा बनविण्याचे काम केले होते. या आराखड्याची पाच टप्प्यात कामे केली जाणार असून यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथे दगडांची झीज झाली आहे. अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केले जाणार आहे . याशिवाय मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहे. विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट हटवून त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यात नामदेव महाद्वाराचा पुरातत्व पद्धतीने दुरुस्ती आरसीसी काम पाडून तेथे मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनविले जाणार आहे. याशिवाय मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून मंदिराशेजारी एक स्काय वॉक बनविला जाणार आहे . अखेरच्या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा , वायरिंग आणि वातानुकूलित यंत्रणा याचे काम केले जाणार आहे . कोरोना काळात विठ्ठल मंदिर बंद असल्याने भाविकांकडून येणारे उत्पन्न बंद झाल्याने 65 कोटींचा आर्थिक फटका मंदिराला बसला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विठ्ठल भक्तांसाठी उभे राहिल्याने निधीची चिंता संपली आहे.
आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या विकास आराखडा आणि इतर प्रश्नासाठी राज्य सरकार सर्वोतपरी मदत करणार असल्याचे दिलेले आश्वासन पाळल्याने येत्या पाच वर्षात जगभरातील लाखो विठ्ठल भक्तांना 700 वर्षापूर्वीचे म्हणजे संत कालीन विठ्ठल मंदिर पाहायला मिळणार आहे.
0 Comments