महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या गुंठेवारी नियमित करण्याचे काम त्वरित सुरू करा आमदार शहाजीबापू पाटील यांनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना केल्या सूचना
सांगोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम दिनांक १२ मार्च २०२१ रोजी मंजूर केली असून ३१ डिसेंबर २०२० पूर्वी गुंठेवारी पद्धतीने झालेली अनाधिकृत बांधकामे व रिकामे भूखंड नियमाधीन करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून दिली असल्याने सांगोला नगरपालिकेने या योजनेचा लाभ सांगोला शहरातील नागरिकांना व मिळकतधारकांना त्वरित मिळावा यासाठी या गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी त्वरीत सुरू करण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेचे प्रशासक तथा तहसीलदार अभिजीत पाटील व मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना दिल्या. काल गुरुवारी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये गुंठेवारी नियमित करण्याची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, सांगोला नगरपालिकेचे प्रशासक तथा तहसीलदार अभिजीत पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, उपअधिक्षक भुमिअभिलेख रेश्मा तांबारे, माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, आनंदराव घोंगडे, नगरपालिका नगररचनाकार आकाश गोडसे व आकाश करे उपस्थित होते. सांगोला नगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे, रिकामे भूखंड या गुंठेवारी नियमित केल्यामुळे नागरिकांची बांधकामे नियमित होऊन त्यांचा दुप्पट जाणारा कर वाचणार असल्याने सांगोला शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सूचनेनुसार गुंठेवारी नियमित करण्याची कार्यवाही त्वरीत सुरू करणार असून येत्या एक-दोन दिवसांमध्ये नगरपालिकेच्या सर्व नोंदणीकृत अभियंत्यांची बैठक घेऊन प्रस्ताव कसा सादर करावा याची माहिती देणार आहे व प्रस्ताव स्वीकारण्याचे प्रकटन नगरपालिके मार्फत लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती प्रशासक तथा तहसीलदार अभिजीत पाटील व मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली
0 Comments