कोरोनामुक्तीनंतर मृत्यू झालेल्यांनाही मिळणार 50 हजारांची मदत!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजारांची मदत केली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारने नऊशे कोटींची तरतूद केली असून आतापर्यंत एक लाख 32 हजार लाभार्थींना मदत मिळाली आहे. परंतु, कोरोनातून बरे झाल्यानंतरही संबंधित रुग्ण इतर आजारामुळे 30 दिवसांत दगावला, तर त्यांच्या वारसांनाही मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यात कोरोनामुळे आत्महत्या केलेल्यांचाही समावेश आहे.
कोरोना मृतांच्या वारसांना मदतीसाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यातील एक लाख 42 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, मदतीसाठी दोन महिन्यांत दोन लाख 28 हजार जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यातील जवळपास 62 हजार अर्ज रिजेक्ट (अपात्र) ठरविण्यात आले आहेत. त्यांची जिल्हा स्तरावर पडताळणी होऊन त्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या सूचनेनुसार एक लाख लाभार्थींशी संपर्क साधला. त्यातील 33 हजार जणांना ऑनलाइन अर्ज करण्यास मदत करण्यात आली. दरम्यान, कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी गेलेला रुग्ण पुढील 30 दिवसांत एखाद्या रुग्णालयात दगावला असल्यास त्याच्या वारसालाही मदत देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील, पण...
कोरोना मृतांच्या अशिक्षित वारसांना ऑनलाइन अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यांच्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची सवलत द्यावी, यासंदर्भात काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार त्यांना ऑफलाइन अर्ज करता येणार आहेत. परंतु, त्या ऑफलाइन अर्जावरून संबंधिताचा अर्ज लगेचच ऑनलाइन भरला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरून रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
''कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी नऊशे कोटींची तरतूद केली असून आतापर्यंत एक लाख 32 हजार मृतांच्या वारसांना 660 कोटी रुपये वितरीत केले आहेत. कोरोनामुक्तीनंतरही 30 दिवसांत मृत्यू झालेल्यांसह कोरोनामुळे आत्महत्या केलेल्यांच्या वारसांनाही ही मदत केली जात आहे.''
- संजय धारूरकर, संचालक, मदत व पुनर्वसन
0 Comments