बाजार समितीत दररोज कांदा लिलाव! 22 दिवसांत 100 कोटींची उलाढाल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने एक दिवासाआड लिलाव सुरू झाला. शेतकऱ्यांची पंचाईत झाली, परंतु आता त्यावर उपाय म्हणून बाजार समितीने कांदा साठवणीसाठी पर्यायी जागा शोधल्या आहेत. ऑईल मिल, जनावरांचा बाजार भरणाऱ्या जागेत आणि बेदाणा मार्केटच्या ठिकाणी कांदा ठेवला जाणार असून त्याठिकाणी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत दररोज लिलावाचे नियोजन असल्याची माहिती कांदा विभागप्रमुख विनोद पाटील यांनी दिली.
अवकळी व अतिवृष्टीमुळे सुरवातीच्या काळात कांदा लागवड कमी प्रमाणात झाली तर काहींचा कांदा वाया गेला. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या तीन महिन्यांत कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. तो कांदा आता बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज सरासरी एक हजार गाड्यांची सोलापूर बाजार समितीत आवक आहे. तीन हजार 800 पर्यंतचा दर आता दोन हजार 200 ते दोन हजार 400 पर्यंत खाली आला आहे. बाजार समितीत कांदा ठेवायला जागा अपुरी पडू लागली. बाजार समितीत 700 ट्रकपर्यंत कांदा साठवू शकतो, अशी स्थिती आहे. परंतु, सोलापूरसह नाशिक, बीड, नगर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यांसह कर्नाटकातूनही कांदा मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत येऊ लागला. आवक वाढल्याने एक दिवसाआड लिलाव करण्याची नामुष्की बाजार समितीत ओढावली. आता त्यावर उपाय शोधून बाजार समितीने कांदा साठवण्यासाठी पर्याय जागा निवडल्या आहेत. त्यामुळे कांद्याचा लिलाव आता रविवार वगळता दररोज होणार आहे. 22 दिवसांत शंभर कोटींची उलाढाल 1 ते 31 जानेवारी या महिन्यातील नऊ दिवसांच्या सुट्ट्या वगळता बाजार समितीत तब्बल 12 लाख 38 हजार 251 क्विंलट कांदा विक्रीसाठी आला होता. अवघ्या 22 दिवसांत 99 कोटी 35 लाख रुपयांची उलाढाल बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच झाल्याची माहिती बाजार समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, जानेवारीत किमान 100 ते सर्वाधिक तीन हजार 800 पर्यंत दर राहिला. परंतु, सध्या कांद्याचा दर सरासरी सोळाशेपर्यंत असून मागील काही दिवसांत आवक वाढल्याने कांद्याचे दर जवळपास चारशे रुपयांनी कमी झाले आहेत.
0 Comments