Hot Posts

6/recent/ticker-posts

49 शिक्षकांना कोरोना! सोलापुरातील 384 पैकी 96 शाळा उघडल्याच नाहीत

 49 शिक्षकांना कोरोना! सोलापुरातील 384 पैकी 96 शाळा उघडल्याच नाहीत


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोरोनामुळे 2021-22 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये दुसऱ्यांदा स्वागत झाले. शहरातील पहिली ते बारावीपर्यंतच्या 384 शाळांपैकी 288 शाळांची मंगळवारी (ता.1) घंटा वाजली. कोरोनाचा धोका संपला नसल्याने 50 टक्‍के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शहरातील शाळा सुरू झाल्या. पहिल्यादिवशी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाळांनी विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे धडे दिले. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसतानाही शाळा सुरू झाल्याने महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी शहरातील 25 शाळांना भेटी दिल्या. त्याठिकाणी असलेल्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांना त्यांनी कशाप्रकारे खबरदारी घ्यायची याचे धडे दिले. महापालिका मराठी शाळा रामवाडी, महापालिका मराठी शाळा क्र. चार, महापालिका उर्दू शाळा रामवाडी, महापाकिला कन्नक प्राथमिक शाळा, रामवाडी, सोनामाता माध्यमिक प्रशाला, महापालिका उर्दू शाळा गरीबी हटाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक हायस्कूल, महापालिका मराठी शाळा क्र. 25 यासह काही शाळांना त्यांनी भेटी दिल्या. शहरातील काहींनी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांशी संवाद साधून उद्यापासून (बुधवारी) शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटातही शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती पहायला मिळाली. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. शाळेत येताना प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात आले. काहीठिकाणी विद्यार्थ्यांचे तापमानही तपासण्यात आले. शहरातील शाळा सुरू करण्यापूर्वी महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वच शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पार पडली. साडेचार हजार शिक्षकांपैकी तीन हजार 204 शिक्षकांचे रिपोर्ट महापालिकेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 49 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बहुतेक शिक्षकांमध्ये कोरोनाची कोणतीही तीव्र लक्षणे नाहीत. कोरोना चाचणीचे अहवाल अजूनपर्यंत न आल्याने 96 शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. संबंधित शाळांमधील शिक्षकांचे रिपोर्ट आल्यानंतर त्या शाळा सुरु होणार आहेत. ग्रामीणमधील रुग्णसंख्या आता कमी होऊ लागली आहे. शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना ग्रामीणमधील शाळांची प्रतीक्षा आहे. तरीही, ग्रामीणमधील रुग्णसंख्या दीडशेपेक्षा कमी झाल्यानंतर ग्रामीणमधील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली. सध्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शिष्यवृत्तीचे तास सुरू आहेत. दहावी-बारावीचेही ऑफलाइन तास सुरू आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांसंबंधीचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments