मरवडे विषबाधा प्रकरण : दोन आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- दुग्धजन्य पदार्थांतून झालेल्या विषबाधेतून मरवडे (ता. मंगळवेढा) येथील दोन मुलीच्या मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी डेअरी चालक संतोष कौडूभैरी व आकाश फुगारे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज येथील न्यायाधीश आर. व्ही. नडदगल्ली यांच्यासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आबासाहेब चव्हाण (रा. मरवडे) यांनी आपल्या मुलींना खाऊ म्हणून मंगळवेढ्यातील समर्थ डेअरीमधून पनीर, श्रीखंड, बासुंदी असे दुग्धजन्य पदार्थ घरी आणले होते. त्या पदार्थातून विषबाधा होऊन त्याच्या दोन लहान मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अन्नभेसळ खात्याच्या अधिकाऱ्यांनी संतोष कौडूभैरी व आकाश फुगारे या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते फरार झाले.
आरोपीच्या अटकेसाठी मरवडे ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून पोलिस निरीक्षकांनी या प्रकरणात हयगय केल्याचा आरोप केला होता. उपस्थित जमावाला उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी शांत करत आरोपींना अटक करणार असल्याचे सांगत दोन पथकाची नियुक्ती केली. दरम्यान, या दोघांना आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे पहाटे ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सांगितले. आज सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले.
पोलिसांनी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठीचा माल कुठून आणला यातील आणखी तपास कामासाठी सात दिवसाची पोलिस कोठडी मागणी केली. तर आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड. धनंजय हजारे यांनी फिर्याद नमुद केलेल्या तारखेप्रमाणे फिर्यादी दुकानात खरेदीसाठी आलाच नव्हता. त्याबाबत सीसीटीव्ही फुटेज सादर करावे, असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने संशयित आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.
0 Comments