Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रीन कॉरीडॉरने दोघांना जीवदान, दोघांना दृष्टी

 ग्रीन कॉरीडॉरने दोघांना जीवदान, दोघांना दृष्टी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील एक महिलेचा मेंदू मृत झाल्यानंतर ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवघ्या 150 मिनिटात या महिलेच्या दोन किडन्यांचे पुणे व सोलापुरात प्रत्यारोपण करण्यात आले. कोरोना साथीनंतर सोलापुरात पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले.
शहरातील एका 48 वर्षीय महिलेस खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तीची स्थिती अत्यवस्थ झालेली होती. डॉक्‍टरांनी उपचाराच्या दरम्यान केलेल्या तपासणी मध्ये तीचा मेंदू मृत झाल्याचे आढळले. तेव्हा डॉक्‍टरांनी या प्रकाराची कल्पना महिलेच्या नातेवाईकांना दिली. तेव्हा या महिलेचे पती व इतर नातेवाईकांनी या महिलेचे अवयवदान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा कुंभारी येथील आश्‍विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास या प्रकाराची कल्पना उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली. त्यानंतर या महिलेस कुंभारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
तेथे या महिलेच्या कार्यक्षम स्थितीत असलेल्या अवयवाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये या महिलेच्या दोन्ही किडन्या व दोन्ही नेत्रांचे दान केले जाऊ शकते हे स्पष्ट झाले. तेव्हा तत्काळ ग्रीन कॉरिडॉर चे आयोजन केले गेले. किडनी दानाच्या प्रतिक्षेत असलेल्या दोन रुग्णांचा शोध घेण्यात आला. तेव्हा पुण्याच्या रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये एक गरजू रुग्ण असल्याची माहिती मिळाली. तसेच कुंभारी येथील रुग्णालयात एक रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत होता.
ग्रीन कॉरिडॉरमध्ये केवळ 150 मिनिटात या महिलेच्या शरीरातील किडनी काढून त्यांचे प्रत्यारोपण करण्याचे काम सुरु झाले. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. सिध्देश्‍वर करजखेडे, रुबी हॉल पुणेचे डॉ. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली 50 जणांची एकूण चार पथके कार्यरत करण्यात आली. तसेच त्यासाठी अवयव घेऊन जाणाऱ्या विशेष अँम्ब्यूलन्सचा समावेश होता.
केवळ 150 मिनिटात या दोन्ही किडन्याचे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रीया पूर्ण करण्यात आल्या. प्रत्यारोपण झालेल्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली आहे. तसेच या महिलेच्या दोन्ही डोळ्यांचे दान शासकीय नेत्रपेढीला करण्यात आले आहे. प्रतिक्षा यादीतील व्यक्तींमध्ये दोन्ही नेत्रांचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments