शासनाने बाळंतपणासाठी दाखवली सरकारी रुग्णालयांची वाट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोरोनाच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयात दिली जाणारी मोफत प्रसूती सुविधा नवीन वर्षात बंद करण्यात आली आहे. यापुढे मोफत प्रसूतीसाठी पात्र लाभधारकांना महात्मा फुले आरोग्य योजनेतील रुग्णांना सरकारी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय व प्राथ.आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयातच जावे लागणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती बाळगणाऱ्या शासनाने गरोदर मातांना पुन्हा सरकारी रुग्णालयांची वाट दाखवली आहे.
मागील वर्षात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना २० डिसेंबर रोजी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत निर्णय घेतला होता. याकाळात शासकीय रुग्णालयावर कोरोनाच्या रुग्णांचा भार असल्यामुळे खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू आहे. त्या रुग्णालयांना पात्र लाभार्थींना मोफत बाळंतपणाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सुविधेचा चा कालावधी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आला होता.ही मुदत संपली असल्यामुळे एक जानेवारीपासून शासकिय योजना मंजूर असलेल्या रुग्णालयांनी योजने अंतर्गत प्रसूतीची प्रकरणे घेऊ नये. अशी सूचना ३१ डिसेंबर रोजी आरोग्य मित्रा मार्फत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात ही योजना सुरू राहणार आहे.
0 Comments