काकांचा राजीनामा तूर्तास नाही! पवारांच्या भेटीविनाच परतले साठे
उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बळिराम साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र तूर्तास त्यांना थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. श्री. साठे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. मात्र, त्यांची शरद पवारांशी भेट झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शारीरिक अस्वस्थतेचे कारण देत बळिराम साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. राजीनामा दिल्यानंतर साठे यांनी मुंबई गाठली होती. त्या ठिकाणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतली. त्या ठिकाणाहूनच शरद पवार यांना फोन केला. त्या ठिकाणी पवार यांनी साठे यांना तूर्तास थांबण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
बळिराम साठे यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हाध्यक्ष कोणाला करायचे, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या बाजूने आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मात्र त्याला विरोध असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामानाट्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भविष्यात कोणत्या घडामोडी घडतात, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
साठे यांनी समर्थपणे पेलली जबाबदारी एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोण होणार, अशी परिस्थिती असताना एकानेही त्या वेळेला होकार दिला नाही. शेवटी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा बळिराम साठे यांच्याकडे सोपवली. सत्ता नसतानाही साठे यांनी ही जबाबदारी अतिशय जोखमीने पार पाडली तर आता सत्तेत आल्यानंतर साठे यांना वेगवेगळ्या मार्गाने त्रास देण्याचे काम काहीजण करत आहेत. मात्र, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून साठे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका पार पडाव्यात, त्यानंतर जिल्हाध्यक्ष कोणाला करायचे ते ठरवू, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेतली असल्याचीही चर्चा सुरू आहे.
0 Comments