उपळाईचे सरपंच संदीप पाटील यांच्यावर पिस्तूलमधून फायरिंग
माढा (कटूसत्य वृत्त):- डिझेल चोरीचा खोटा आरोप का केला? या कारणावरून उपळाई खुर्दचे (ता. माढा) सरपंच संदीप पाटील यांच्यावर पिस्तुलमधून फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा माढा पोलिसात दाखल झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी (ता. 7) सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादी संदीप पाटील हे घरासमोर उभे असताना प्रमोद जाधव, विनोद जाधव, सुवर्णा जाधव, कौशल्या जाधव ( सर्व रा. शिंदेवाडी, ता. माढा) व आनंद बारबोले, तनुजा बारबोले (रा. दारफळ ता. माढा) हे आले व त्यांनी फिर्यादी संदीप पाटील यांना तुम्ही प्रमोदवर डिझेल चोरीचा खोटा आरोप का केला, असे म्हणून शिवीगाळ करू लागले.
त्यावेळी संदीप पाटील यांच्या भावकीतील किरण पाटील व समाधान पाटील यांनी आरोपींना उद्देशून तुम्ही संदीप पाटील यांना शिवीगाळ का करता अशी विचारणा केली. त्यावेळी महिलांनी हाताने व लाथा - बुक्क्यांनी तर प्रमोद जाधव याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने संदीप पाटील यांच्या भावकीतील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संदीप पाटील सोडविण्यासाठी मध्ये गेले असता विनोद जाधव हा संदीप पाटील यांच्या अंगावर धावून गेला व आनंद बारबोले याने त्याच्या जवळील पिस्तुल काढून संदीप पाटील यांच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने रोखले व तुला खलास करतो असे म्हणून फायर केला. या प्रकरणी सर्वांना अटक केली असून या घटनेचा तपास करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शाम बुवा करत आहेत.
0 Comments