सोलापूरात शेतकऱ्यांनी बंद पाडले विद्युतीकरणाचे काम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर- मोहोळ लोहमार्गावर सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम बंद पाडले. त्यामुळे बाळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमीन भूसंपादनाचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर पोलिस बळाचा वापर केला जात असल्याने शेतकऱ्यांनी रेल्वेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी दिला.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरणाच्या कामाकरीता जमीन घेतली. या परिसरात सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. २००६ पासून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात न आल्यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले. परंतु, बाधित झालेल्या शेतजमीनचा मोबदला मात्र त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन हे १६ वर्षांपासून चालढकल करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
यापूर्वी शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला न मिळाल्याने रेल्वे प्रशासनाचा काळे झेंडे दाखवित निषेध केला. बसवेश्वर नगर बाळे तसेच मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी अनेकवेळा सरकार दरबारी खेटा मारल्या. मंत्र्यांना निवेदनदेखील दिली, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. बाळे ते मोहोळ दरम्यान जवळपास १३ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रशासनाने संपादीत केल्या आहेत. यामध्ये जवळपास १०० शेतकऱ्यांचा समावेश आहे. बाळे परिसरातील एकूण १८ शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये संपादीत करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करताना अमोल काळजे, अभयकुमार काळजे, अ. गफूर जमादार, विशाल कराठे, बाबूराव धुम्मा आदींसह शेतकरी सहभागी होते.
0 Comments