नऊ हजार स्वस्त धान्य दुकाने होणार आयएसओ मानांकित
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर सह अन्य चार जिल्ह्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाने, तहसील कार्यालये व धान्य साठवणुकीची गोदामे आयएसओ मानांकना साठी मूळचे पापरी चे रहिवासी व सध्या पुणे येथे कार्यरत असणारे पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी कंबर कसली असून, हे सर्व काम 19 फेब्रुवारी या शिवजयंती पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना उपायुक्त कुलकर्णी म्हणाले, राज्यात व अन्य भागात कोणीही उपाशी राहू नये त्याच्या उदरनिर्वाहा साठी त्याला स्वस्त धान्य मिळावे यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांची निर्मिती केली आहे. मात्र सध्या स्वस्त धान्य दुकाना कडे बघण्याची सर्वसामान्यांची मानसिकता चांगली नाही. स्वस्त धान्य दुकान म्हणजे काळाबाजार व भ्रष्टाचाराचा अड्डा असा सर्वसामान्यांचा समज आहे. ग्रामीण भागातील अनेक धान्य दुकानात अस्वच्छता, जाळ्या, उंदराचे साम्राज्य असे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे उपायुक्त कुलकर्णी यांनी सांगितले.
पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर हे पाच जिल्हे उपायुक्त कुलकर्णी यांच्या आधिपत्याखाली येतात. या पाच जिल्ह्यात 9 हजार 250 स्वस्त धान्य दुकाने, 85 तहसील कार्यालये व 85 धान्य साठवणुकीची गोदामे आहेत. या सर्वांना आयएसओ मानांकनासाठी मी गेल्या महिन्याभरा पासून कामाला सुरुवात केली आहे त्याला दुकानदारा कडून प्रतिसादही मिळत आहे. दुकानाची रंगरंगोटी करणे, दर फलक लावणे, अग्निशामक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे, नाईट विजन कॅमेरे अन्नभेसळ विभागाचा परवाना या सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. सध्या नीटनेटकेपणा ला महत्त्व आहे, स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिका धारक माल घेण्यासाठी गेल्यास त्याला समाधान वाटले पाहिजे. महानगर पालीका व नगरपालीका क्षेत्रातील दुकानांना शॉप ॲक्ट परवाना हा आवश्यक असून, धान्य दुकानाचा परवाना 31 डिसेंबरपूर्वी नूतनीकरण झाला पाहिजे,तसेच दुकानात पिण्याचे स्वच्छ पाणी ठेवण्या संदर्भात ही दुकानदारांना सूचना दिल्या आहेत.
या सर्व कामासाठी 5 जिल्हा पुरवठा अधिकारी, दोन अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी कामाला सुरुवात केली आहे. सर्व गोदामे स्वच्छ करून त्यांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. पाच जिल्ह्यात 85 तहसील कार्यालये आहेत, अपवाद वगळता त्यांची ही अवस्था बरी नाही ती स्मार्ट करण्यासाठी सर्व तहसीलदारांना सूचना दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. दुकानात कुठल्याही क्षणी नैसर्गीक आपत्ती येऊ शकते त्या माध्यमातुन अप्रिय घटना घडू शकते, साधा धुर जरी दुकानात आला तरीही सायरन वाजून धोक्याची सूचना मिळण्याची यंत्रणा दुकानात बसविण्यात येणार आहे. सध्या ग्राहकाला माल दिल्यानंतर ग्राहक रोख पैसे देतो, अनेक दुकानदार याच माध्यमातून ग्राहकाकडून विक्री दरापेक्षा जादा पैसे घेण्याच्या सर्रास तक्रारी आहेत त्यासाठी ग्राहकाने माल घेतला व मशीनवर आंगठा ठेवल्यानंतर ग्राहकाच्या खात्यातून थेट रेशन दुकानदाराच्या खात्यावर पैसे वर्ग होणार असल्याची यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.सर्व नागरीकांनी सहकार्य करण्याचे अवाहन उपायुक्त कुलकर्णी यांनी केले.
0 Comments