Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुक करणारा टेम्पो पकडला ३० लाखाचा मुद्देमाल जप्त.

 मोहोळ पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुक करणारा टेम्पो पकडला ३० लाखाचा मुद्देमाल जप्त.



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- शासनाने विक्रीसाठी बंदी घातलेल्या  गुटख्याचा टेम्पो बुधवार २४ नोव्हेंबर रोजी मोहोळ पोलिसांनी पकडला. आणि १७ लाख रुपये किंमतीच्या गुटख्या व आयशर गाडी सह तब्बल ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले घेऊन गुन्हा दाखल केला आहे. अफसर मझहर सय्यद (वय ३५ वर्षे, रा. उल्लाल उपनगर बेंगलोर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. हा गुटखा कर्नाटकातून गुजरात मध्ये नेला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
         याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मानवी शरीराला अपायकारक असणारा व  विक्रीसाठी बंदी असलेला अवैध गुटखा मोहोळ शहरातून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी पोनि अशोक सायकर यांच्या मार्गदर्शना खाली हेड कॉ. सचिन माने, पोलीस नाईक अमोल घोळवे, पोलीस नाईक प्रविण साठे, महिला पोलीस नाईक अनुसया बंडगर,  सिध्दनाथ मोरे यांच्या पथकाने चिखली ता मोहोळ गावच्या शिवारात सोलापूर-पुणे महामार्गावर सापळा लावला होता. यावेळी मोहोळ कडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या आयशर टेम्पो (क्र. KA 01 AK 4522) पोलिसांनी पाठलाग करुन थांबवून चौकशी केली. यावेळी चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांनी सदर टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये विविध कंपन्यांचा अवैध गुटखा मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी तब्बल १७ लाख ०६ हजार चारशे रुपये किंमतीच्या गुटख्यासह एकुण ३० लाख ०६ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून टेम्पो चालकाला गजाआड केले.
        याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक प्रशांत कुचेकर यांनी  पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो चालक अफसर मझहर सय्यद (वय ३५ वर्षे, रा. उल्लाल उपनगर बेंगलोर, कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोनि अशोक सायकर हे करीत आहेत. 
या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, पोलीस उपाधीक्षक सुर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी मोहोळ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाचे अभिनंदन केले.


Reactions

Post a Comment

0 Comments