जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशी उघडे स्वरूप
प्रभाकर देशमुख यांनी घातला उपकार्यकारी अभियंता यांना घेरावमोहीम न थांबवल्यास अधीक्षक अभियंत्यां कपडे फाडून तोंडाला काळे फासण्याचा इशारा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण प्रशासनाच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने सोमवारी सायंकाळी उग्र स्वरूप धारण केले. यावेळी मोहोळ महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घालत यापुढील काळात विद्युत पुरवठा खंडित केल्यास आणि खंडित केलेल्या विद्युत पुरवठा पूर्ववत न केल्यास थेट महावितरणच्या सोलापूर कार्यालयात जाऊन अधीक्षक अभियंत्यांची कपडे फाडून त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा आक्रमक इशारा प्रभाकर भैय्या देशमुख यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला.
यावेळी सलग तीन दिवस अंदोलनाला बसूनही या आंदोलनाकडे बेजबाबदारपणे पाठ फिरवणाऱ्या मोहोळ महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता ताकपिरे आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन घेराव घालून आंदोलकांनी विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबतचा जाब विचारला. यावेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित भ्रमणध्वनीवरून महावितरणच्या सोलापूर कार्यालयातील वरिष्ठांशी संपर्क साधून याबाबत योग्य ते आदेश देण्याची विनंती केली. यावेळी मोहोळचे उपकार्यकारी अभियंता हेमंत ताकपेरे यांनी सोलापूरचे अधीक्षक अभियंता सांगळे यांच्याशी भैय्या देशमुख यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.त्यानंतर या सर्व गदारोळाची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे एक पथक महावितरण कार्यालयाकडे धावले. यावेळी पोलीस अधिकारी बांधवांशी प्रभाकर भैया देशमुख यांनी शेतकऱ्यांची कैफियत मांडत संवाद साधला. यावेळी प्रशासनाने त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. हा मुद्दा वैयक्तिक नसून हा मुद्दा शेतकर्यांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अधिकार्यांना केवळ फक्त वसूल दिसत आहे. करोना काळात शेतकरी संपूर्णता अडचणीत आहे. दिवाळी देखील अत्यंत साधेपणाने साजरी केली. कर्जाचा डोंगर उभा असताना अशा अडचणीच्या काळात महावितरणने सुरू केलेली हि विद्युत खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबवावी. अन्यथा सोलापूर येथील कार्यालयात जाऊन महावितरणचे अधीक्षक अभियंताचे कपडे फाडून त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी देशमुख यांनी माध्यमांसमोर दिला.
0 Comments