Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला शहरातील आरोग्य दूतांचे हात थांबले ; निविदा प्रक्रियेस विलंब

सांगोला शहरातील आरोग्य दूतांचे हात थांबले ; निविदा प्रक्रियेस विलंब


मुख्याधिकारी यांच्या कारभारामुळे "दाल में कुछ काला है" ची चर्चा



सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांचा  ठेका संपल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काल दि. 12 नोव्हेंबर पासून काम बंद ठेवले असून शहरातील साफसफाई कामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाची मुदत संपल्यानंतरही मुख्याधिकारी व प्रशासनास जाग न आल्याने आमचा पगार कोण करणार? असे म्हणत ठेकेदारी सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले आहे.
शहराच्या साफसफाई बाबतच्या  ठेक्याची मुदत दि. 30 सप्टेंबर रोजी संपणार होती. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया करण्यासाठी सदर ठेक्यास आरोग्य सभापती यांच्या सूचनेनुसार सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते एक महिना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी पुढील निविदा प्रक्रिया तात्काळ राबवणे गरजेचे होते. परंतु याकामी वेळकाढूपणा करत सदर कामास प्रशासकीय मंजुरी दि. 17 सप्टेंबर रोजी आली असतानासुद्धा नगरपालिका प्रशासनाने दि. 1 ऑक्टोबर रोजी निविदा प्रसिद्धीकरण केली. यामध्ये जवळपास बारा ते तेरा दिवसाचा विलंब करण्यात आला. तसेच या  कामाचा तांत्रिक लिफाफा दि. 23 ऑक्टोबर रोजी उघडण्यात आला. यावेळीही विलंब करत सफाई कर्मचाऱ्यांनी संप केल्यानंतर आर्थिक लिफाफा पंधरा ते सोळा दिवसानंतर  दि. 12 नोव्हेंबर रोजी उघडण्यात आला. 

सांगोला शहराचा विस्तीर्ण व्यास पाहता आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी पाहता नगरपालिका प्रशासनाने विशेष करून मुख्याधिकारी यांनी त्याकामी केलेल्या दिरंगाईमुळे  शहराच्या आरोग्याची व्यवस्था पाहणारी यंत्रणा कोलमडली आहे.
स्वच्छता ठेक्याची मुदत संपणार आहे आणि नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल याची माहिती असतानासुद्धा मुख्याधिकारी यांनी नेमक्या कोणत्या इच्छापूर्तीसाठी याकामी सुस्तपणा दाखवला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे "कर्मचारी वाऱ्यावर आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात" अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोरोना काळात जीव धोक्यात घालून कामगार उपाशी आणि प्रशासन मात्र सुखाशी अशी चर्चा सुद्धा कर्मचाऱ्यांमधून ऐकावयास मिळत आहे. 

स्वतःच्या आर्थिक वाटाघाटासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळ
सांगोला नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुदत संपल्याने व पगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने संप केला. त्यामुळे घाईगडबडीने निविदा उघडून मुख्याधिकारी यांनी ठरावाची प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. या सर्व कामात मुख्याधिकारी यांची भूमिका पारदर्शी दिसत नाही. कामगारांनी संप केल्यामुळे घाईगडबडीने अर्धवट माहितीचा संयुक्त ठराव बनवून माझ्याकडे पाठवण्यात आला होता. परंतु सदरचा ठराव स्थायी समिती अथवा सर्वसाधारण सभेमध्ये घेऊन सर्वानुमते निर्णय घेतला जाईल.
- सौ. राणीताई माने, लोकनियुक्त नगराध्यक्षा

Reactions

Post a Comment

0 Comments