मोहोळ तालुक्यातील भीमा आणि सीना नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे
तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष प्रशांत बेडसे -पाटील यांचे आवाहन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील भीमा आणि नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांचे संभाव्य पूरपरिस्थिती पासून संरक्षण करण्यासाठी मोहोळ महसूल विभाग सातत्याने दक्ष आहे. मोहोळ तालुक्यातील जाणाऱ्या भीमा आणि सीना या दोन्ही नदीकाठीची परिस्थिती वरील धरणातून पाणी सोडल्यामुळे असुरक्षित होऊ शकते त्यामुळे या दोन्ही नदीकाठच्या नागरिकांनी त्याचबरोबर त्या त्या गावातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी ग्रामसुरक्षा समित्यांनी आतापासूनच दक्ष राहावे असे आवाहन मोहोळचे तहसीलदार तथा मोहोळ तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष प्रशांत बेडसे पाटील यांनी केले आहे.सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर, पंढरपूरचे प्रांताधिकारी अधिकारी तथा उपविभागागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांनी महसूल विभाग दक्ष ठेवत पूर परिस्थिती बाबत आवश्यक त्या सूचना प्रशासनास दिले आहेत. उजनी आणि वीर धरण व परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दि.9/10/2021 रोजी वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून रात्री 9.00 वाजता 5000 Cusecs विसर्ग भिमा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या सीना नदीच्या पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सिना कोळेगाव प्रकल्पातून दि १०.१०.२०२१ रोजी दुपारी २.१५ वाजता १२६६७ ने विसर्ग सुरू झाला आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. यामुळे येत्या काही तासात भीमा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे. भीमा आणि नदीकाठच्या गावांमधील सर्वांनी काळजी घ्यावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही तहसीलदार तथा मोहोळ तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष प्रशांत बेडसे -पाटील यांनी केले आहे. पूरपरिस्थिती आणी अतिवृष्टी दरम्यानच्या काळात काय करावे काय करू नये याबाबत सविस्तर सूचना तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील यांनी पुढीलप्रमाणे दिले आहेत. पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास पुलावरून धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये अथवा जाऊ नये.अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता राहील. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत.वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.नदीकाठच्या लोकांनी आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी बसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे.या कालावधीमध्ये आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये.घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे.घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तू,विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे.आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे.आपले जवळ दैनंदिन लागणारी औषधे, बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात. मोबाईल फोन बॅटरी चार्ज करून ठेवावेत.अतिवृष्टी मुळे नुकसान टाळण्यासाठी नदीकिनारी व सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी व अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पाऊस पडत असताना धबधब्याच्या अथवा पुलावर पाणी तत्सम ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये.विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. मोबाईलचा वापर करू नये.ग्राम कृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी.आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्याने प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे असेही आवाहन यावेळी तहसीलदार बेडसे पाटील यांनी केले.
0 Comments