राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने प्रशासनातील "नवदुर्गांचा" सन्मान
सांगोला (कटूसत्य वृत्त):- तालुका प्रतिनिधी पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत खर्या अर्थाने स्त्री पुरुष समानता हे मूल्य सिद्ध करून दाखवणाऱ्या आधुनिक युगातील प्रशासनातील नवदुर्गाचा म्हणजेच प्रशासकीय सेवेत ही आपल्या वेगळेपणाची छाप सोडणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सन्मान करून त्यांना या पुढील कार्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेश कार्यालयातून अध्यक्षा रुपालीताई चाकणकर उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सखुबाई वाघमारे, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष सुचीताकाकी मस्के, उपाध्यक्ष जयश्री पाटील, उपाध्यक्ष मंगल खाडे, शशिकला खाडे, सरचिटणीस रुक्मिणी वायदंडे, संगीता पाखरे व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्राजक्ता पाटील आदींसह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा गुरुवार दि 14 ऑक्टोबर रोजी सन्मानपत्र व मानाचा फेटा देऊन सत्कार केला. गेल्या अनेक वर्षांपासून महसूल प्रशासनात आपल्या कार्याची वेगळीच छाप सोडणाऱ्या नायब तहसीलदार श्रीमती शुभांगी अभंगराव, तालुका वैद्यकीय अधिकारी सीमा दोडमनी, सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप, बालविकास प्रकल्प अधिकारी आसमा आत्तार, महावितरणच्या सहाय्यक अभियंता सुजाता पवार, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गवळी, कृषी सहाय्यक दिपाली शेंडे, सांगोला तहसील कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती अनुराधा बिडकर, अश्विनी मागाडे व आरोग्य सहायीका कांता तलांडे आदी प्रशासनात काम करणाऱ्या आधुनिक युगातील नवदुर्गांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला व प्रशासनात काम करताना महिलांचे सक्षमपणे प्रतिनिधित्व करत असल्याबद्दल पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. प्रशासनात काम करत असताना अशा पद्धतीने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने आपण केलेल्या निरंतर सेवेचे कौतुक केल्याने या पुढील काळात काम करण्यासाठी आणखी बळ किंवा प्रेरणा मिळते अशी भावना यावेळी प्रशासनातील नवदुर्गांनी व्यक्त केली.
0 Comments