धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार -पाेपट कुंभार धवल सिंहाच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मरगळ दूर होत आहे. सर्व कार्यकर्ते हातात हात घेऊन धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या मागे उभे राहत काँग्रेसचा हात भक्कम करीत असल्याचे चित्र सध्या सोलापूर जिल्ह्यात दिसत आहे .मंगळवेढा, दक्षिण सोलापूर तालुक्यानंतर धवलसिंह यांचा मोर्चा मोहोळ तालुका कडे निघत असून आज आणि उद्या असा दोन दिवसीय मोहोळचा दौरा असल्याची माहिती मोहोळ काँग्रेस शहराध्यक्ष पाेपट कुंभार यांनी दैनिक कटूसत्य शी बोलताना दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आठ दिवसातच सर्व तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस भवनात घेतली होती ती फक्त ओळख परेड होती मी पूर्ण जिल्हा पिंजून काढणार असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी नियोजन ही केले आहे त्यांच्या या नियोजनावर खुद्द माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी आनंद व्यक्त करीत कार्यास शुभेच्छा दिल्या. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकहाती कार्यक्रम धवलसिंह यांनी ठेवला आहे. महिनाभरात प्रत्येक खेडोपाडी जाऊन भेटी देऊन ती परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत. राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जिल्ह्यात धवलसिंह यांचेमार्फत आम्हाला चांगले पाठबळ मिळत असल्याचेही कुंभार यांनी बोलताना सांगितले. पोट निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. मोहोळ शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी व शिवसेनेचे अनेक नाराज कार्यकर्ते हातात हात घेण्यास इच्छुक असल्याचे ही सूचक वक्तव्य कुंभार यांनी केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोहोळ नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा आम्ही फडकवणार असल्याचाही त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. गेली अनेक वर्षे मोहोळ शहराची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्या हातातून सत्ता काँग्रेसच्या हातात जनताच देणार असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0 Comments