सांगोला महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराने लक्ष्मीनगर ग्रामस्थ झाले हैराण
अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत गाव आहे अंधारात
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर हे गाव महावितरण विभागाच्या भोंगळ आणि अनागोंदी कारभाराने गेली आठ दिवस अंधारात आहे.गावठाण हद्दीतील डिपी बंद असल्याची माहिती लाइनमन, शाखा अभियंता, यांना तात्काळ दिली असताना विविध कारणांचा पाढा सांगत डीपी बसविण्यासाठी महावितरण विभागाचे अधिकारी टोलवाटोलवी करून वेळ मारून नेत आहेत.त्यामुळे आठ दिवस नागरिकांना पाण्यासाठी वणवण करीत फिरावे लागत आहे.
महावितरण विभागाचे कार्यकारी उपअभियंता आनंद पवार हे वैदकीय कारणास्तव रजेवर आहेत.त्यांनी अशा अडचणीला प्राधान्य देवून वीज पुरवठा खंडित झाला तरी तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करून नागरिकांच्या अडचणी दूर करत होते,पण त्यांच्या रजेच्या कालावधीत मात्र ज्यांच्या कडे या कार्यलयाचा पदभार आहे.ते मात्र आपल्याच तोऱ्यात असल्याचे दिसून येत आहेत.लोकांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ते उत्साही नसल्याचे दिसून येत आहे.अनेकदा गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी,उपसरपंच आणि सदस्यानी याबाबत महावितरण विभागाच्या सांगोला कार्यालयाशी संपर्क साधला परंतु अकार्यक्षम आणि कामचुकार अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे.
लक्ष्मीनगर येथील डीपी लवकरात लवकर नाही बसविला तर सांगोला येथील महावितरण कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी आणि विविध संघटनांनी दिला आहे.
0 Comments