तृतीयपंथीयांना मिळणार ओळखपत्र ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- तृतीयपंथीयांना ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्राची आवश्यकता असते. त्यांना ओळखपत्र देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथी पोर्टल काढले आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर परसन्स यामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त तथा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव कैलास आढे यांनी केले आहे.
तृतीयपंथीय यांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत, विभाग 6 व 7 नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजविज आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरू केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी या वेबसाईटमध्ये ॲप्लाई ऑनलाईनवर जाऊन युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून माहिती भरावी. ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करावीत.
जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच तक्रारींसंदर्भात तक्रार निवारण समितीची / कक्षाची स्थापना करणे आवश्यक असल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.तृतीय-2018/प्र.क्र.26/ सामासु दिनांक 7 ऑक्टोबर, 2020 अन्वये तृतीयपंथीय यांच्या प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सोलापूर जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे.
जास्तीत जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी संबंधित वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन आढे यांनी केले आहे.
0 Comments