मोहोळ शहरात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह तब्बल १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज केला लंपास

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील बागवान नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह तब्बल १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली असून २३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. शहरात पुन्हा एकदा घरफोडीचे सत्र सुरू झाल्याने शहरवासीयांनी मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या. घटनेची नोंद मोहोळ पोलिसात आली आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बागवान नगर मोहोळ येथील शाहरुख रमजान बागवान हे टमटम चालक असून त्यांचे वडील रमजान बागवान हे फळ विक्रेते असून एकत्र कुटुंबात राहतात. बुधवार २२ सप्टेंबर रोजी रात्री जेवण करुन बागवान कुटुंबिय झोपले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी किचन मधील कपाट उचकटून त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा एकुण १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी जाताना त्यांच्या हॉलला बाहेरुन कडी लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी रमजान बागवान यांना त्यांच्या घराला कोणीतरी बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आले. त्यानंतर शेजाऱ्याला आवाज दिल्याने त्याने दरवाजा उघडला. त्यानंतर बागवान कुटुंबियांनी किचन मध्ये जाऊन पाहीले असता, सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे व कपाट उचकटल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पहिले असता १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम व ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आहे.
याप्रकरणी शाहरुख बागवान यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या या घटनेमुळे मोहोळ शहरात चोरट्यांनी डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले असून मोहोळ पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे. ग्राम सुरक्षा दलाच्या बैठकीच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत. चोरी झाली की नागरिक धास्तावून जातात . चोरीच्या चौकशीपेक्षा चोरी झालेल्याची चौकशी जास्त होते. जसा की तोच चोरी करून आला आहे. त्यामुळे चोरी होऊनदेखील बरेच नागरिक चोरीबाबत मूग गिळून गप्प बसतात. मोहोळ पोलीस प्रशासनासमोर अशा चोरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागात रात्रगस्त आणखी वाढवणे गरजेची बाब बनली आहे.
0 Comments