नराळे गावच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिणारा क्षण : मा.आम. दीपकआबा साळुंखे- पाटील

नराळे येथे आम. शहाजीबापू पाटील मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा संपन्न

सांगोला (कटुसत्य वृत्त) : नराळे ता सांगोला येथे आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन सोहळा आम. शहाजीबापू पाटील मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बाबुरावभाऊ गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे, किसनआबा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना आम. शहाजीबापू पाटील म्हणाले जनतेच्या आरोग्याच्या सोईसुविधा यातला एक महत्त्वाचा टप्पा आज या ठिकाणी पूर्ण झाला आहे. मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या आशीर्वादातून व कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे यांच्या अथक प्रयत्नातून आज नराळे गावामध्ये आरोग्य उपकेंद्राचा यशस्वीरित्या भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून डोंगराळ भागातील अतिशय बिकट अवस्थेतल हे गाव आहे. आजारी रुग्णांला दवाखान्यात नेण्यासाठी खूप धावपळ होत होती. ती आता बंद झाली. या ठिकाणी दवाखाना झाल्यामुळे माता भगिनींची होणारी गैरसोय दूर झाली आहे. असे सांगत, म्हैसाळ पाण्यापासून वंचित राहिलेलं हे गाव या गावांमध्ये म्हैसाळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूर्व दिशेला बंद पाइपलाइनने पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. व प्रामाणिकपणाने नराळे गावच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत दिपकआबांनी जो शब्द दिला होता. त्याची वचनपूर्ती त्यांनी केली आहे. इतर ही समस्या मी व दिपकआबा प्रामाणिकपणाने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी आम. शहाजीबापू पाटील यांनी दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले नराळे गावच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा हा दिवस आहे. भविष्य काळामध्ये आपल्या आरोग्याच्या सोयी सुविधा या आरोग्य उपकेंद्रामधून उपलब्ध होणार आहेत. एकेकाळी ऊसतोडीला जाऊन कष्ट करून पोट भरणारी नारळे गावातील नागरिकांना व वयस्कर व माता-भगिनी आजारी पडल्या तर जत किंवा जवळा याठिकाणी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा प्रकारची भयानक अवस्था या परिसराची होती. जसजसा काळ बदलत गेला तस तशा अपेक्षाही वाढत गेल्या. परंतु नराळे गावाला काही देता आले नाही. परंतु शब्दाला जागणारा सभापती म्हणजे अनिल भाऊ मोटे यांच्या अथक प्रयत्नातून व जिल्हा परिषदेच्या दाढेतून घास हिसकावून आणावा तसा पैसा उपलब्ध करून गावात आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानिमित्ताने आज नराळे गावामध्ये या आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. सांगोला तालुक्याच्या शेवटच्या टोकाचं हे अत्यंत गरीब असं गाव व आरोग्य सोयीसुविधांपासून वंचित राहिलेले गाव आहे. पाण्याच्या योजनेपासून दूर राहिलेले हे गाव जी कामे अपूर्ण राहिली आहेत ती कामे मी व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्या गावामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्याच्या ज्या सोयी-सुविधा असतील त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनिल भाऊ मोटे यांच्या सहकार्यातून नराळे गावाला देण्याचा प्रयत्न करू. घेरडी, हंगिरगे, पारे, डिकसळ ही चार गावे तालुक्याच्या बाजूला असून, आरोग्य सोयी सुविधांपासून वंचित आहेत. इथून पुढच्या काळामध्ये या गावांना आरोग्य सोयी सुविधा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. या आरोग्य उपकेंद्राचे काम अतिशय दर्जेदार पणाने करावे, भविष्यकाळात या गावातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार हे आरोग्य मंदिर आहे. चार साडेचार वर्षाच्या काळामध्ये सभापती अनिल मोटे यांनी आपल्या परिसरासाठी जे जे काही करता येईल ते ते प्रामाणिकपणाने केले आहे. नारळे गावातील जोशी समाजाच्या घरकुलासाठी शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी , प्रांतअधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांची बैठक लावून जोशी समाजाला दोन एकर जमीन देण्याचा प्रयत्न करणार आहे. असे आश्वासन यावेळी मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले.
यावेळी बांधकाम विभाग उपअभियंता मुळीक रावसाहेब, मा. उपसभापती तानाजी चंदनशिवे, मा. सरपंच दिलीप मोटे, योगेशदादा खटकाळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवासदादा करे, सरपंच चंद्रकांत करांडे, तानाजी गोयकर, डॉक्टर नरळे, सचिन चंदनशिवे, चांद शेख, वसंत पावणे, तमंगे रावसाहेब, सरपंच बिरा पुकळे, पिंटू पाटील यांच्यासह नराळे, पारे, हंगिरगे, डिकसळ गावचे सरपंच- उपसरपंच,ग्रा.प. सदस्य तसेच नराळे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments