सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकीय दबावापोटी गरीब जनतेवर हेतूपूर्वक कारवाई करीत आहेत का ? - आ. प्रणिती शिंदे
करण म्हेत्रे यांच्या अंत्यविधीसाठी जमा झालेल्या नागरीकांवर होत असलेल्या अन्यायकारक कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांना संतप्त सवाल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लष्कर विभागातील सामाजिक कार्यकर्ते स्व. करण म्हेत्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा दि. 16 मे 2021 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान निघाली होती. स्व. करण म्हेत्रे यांच्या प्रेमापोटी या अंत्ययात्रेत मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. यादरम्यान पोलीसांनी नागरीकांना अंत्ययात्रेत जाण्यास रोखल्यामुळे नागरीक व पोलीस प्रशासनामध्ये किरकोळ वादावाद झाला. या अंत्ययात्रेतील फोटा व व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. त्या दिवशी संध्याकाळी सुमारे 8 च्या दरम्यान पोलीस प्रशासनांनी या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरीकांविरोधात सुमारे 200 ते 250 जणांवर कलम 353, 188 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. प्रत्येक्षात 8 ते 10 नागरीकांसोबत वादावाद झाला असला तरी 200 ते 250 जणांवर सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंदविणे हे अन्याय कारक आहे, त्याबददल आमदार प्रणिती शिंदे व मोची समाजातील शिष्टमंडळ यांनी सोलापूरचे पोलीस आयुक्त यांची भेट घेवून सर्व परिस्थितीची माहिती दिली. तसेच ज्या 8 ते 10 नागरीकांनी पोलीसांशी वादावाद केला होता त्या नागरीकांची नावे पोलीस प्रशासनाला देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाने दिले. परंतू निरपराध नागरीकांवर नोंद केलेला कलम 353 (सरकारी कामात अडथळा आणणे) गुन्हा हा रद्द करून कलम 188 अंतर्गत कारवाई करावी अशी विनंती केली. त्यावेळेस पोलीस आयुक्तांनी शहानिशा करून जे खरोखरच दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून निरपराध नागरीकांवरील गुन्हे रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतू त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी संपूर्ण लष्कर परिसर, बेडरपूल, लोधी गल्ली येथील रस्ते संपूर्णपणे बंद करून नागरीकांच्या घरामध्ये घुसून दिसेल त्या युवकांना कोरोना टेस्ट करण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवून त्यांच्यावर अन्यायकारक रितीने अटकेची कारवाई केली. त्यामध्ये 50 जणांना अटक केली. त्यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने सर्व 50 जणांना जामीन मंजूर केला. तसेच या संपूर्ण परिसरातील रहदारीचे रस्ते बंद करून नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार केले. तसेच या परिसरातील नागरीकांना भाजीपाला व जिवनाश्यक वस्तूंची खरेदी, दवाखान्यातील उपचार, एखादी अपघाती घटना घडल्यास येण्या-जाण्यासाठीचा रस्ता सोडला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरीकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून गोर-गरीब नागरीकांवरील अन्यायकारक कारवाई थांबविण्याची मागणी केली. तसेच माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना फोन करून पोलीस आयुक्त करीत असलेल्या अन्यायकारक कारवाईबददल माहिती देवून ती कारवाई तात्काळ स्थगित करण्याबद्रदल आदेश देण्याची मागणी केली. परंतू पोलीस आयुक्तांनी हि अन्यायकारक कारवाई सुरुच ठेवून मोदी, मौलाली चौक, लष्कर या भागातील विशिष्ट समाजातील युवकांना हेतूपूर्वक अटक केली. हा समाज कष्टकरी व गरीब असून या समाजातील बहुतांश लोक हातावर पोट असलेले आहेत. तसेच या गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलेल्या निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. याबद्दल लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंतीचा अवमान करत अंत्यविधीला सामिल होणारे नागरीक जसे काही आतंकवादी असल्याप्रमाणे त्यांच्यावर घरात घूसून अटकेची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त हि जी कारवाई करीत आहेत ती वैयक्तिक आकसापोटी किंवा कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी करीत आहेत असा संशय निर्माण होत असल्याचे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त करून सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा निषेध केला आहे. तसेच हि जर कारवाई स्थगित केली नाही तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
0 Comments