Hot Posts

6/recent/ticker-posts

खाजगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन प्लांट उभारावेत जिल्हाधिकारी-मिलींद शंभरकर

 खाजगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन प्लांट उभारावेत जिल्हाधिकारी-मिलींद शंभरकर

                  पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  पंढरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  बाधित रुग्णांना तात्काळ आवश्यक उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाकडून खाजगी हॉस्पिटला कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या हॉस्पिटला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहिल यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु भविष्यातील  परस्थितीचा विचार करुन जादा खाटांची संख्या असलेल्या खाजगी रुग्णालयांनी स्वत:चे  ऑक्सिजन प्लांट उभारावेत अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.

             कोरोना रुग्णांच्या निदानासाठी व ऑक्सिजनच्या सुयोग्य वापरासंदर्भात खाजगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबत प्रांत कार्यालय, सांस्कृतिक भवन, पंढरपूर येथे बैठकीत आढावा घेण्यात आला.  बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांच्यासह तालुक्यातील खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर, निमा संघटनेचे डॉक्टर उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी  शंभरकर म्हणाले,  जादा खाटांची रुग्ण संख्या असलेल्या खाजगी रुग्णालयांनी  ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी आवश्यकती प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने  त्या ठिकाणी कोरोना संसर्गहोण्याची शक्यता अधिक आहे. गर्दी होणार नाही यांची दक्षता संबधित हॉस्टिलने घ्यावी.  तसेच रुग्णालयाचे फायर ऑडीट, ऑक्सिजन ऑडीट, इलेक्ट्रीक ऑडीट करुन घ्यावे .  तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने तात्काळ उपचारासाठी त्या भागातच कोविड केअर सेंटर उभारावेत. ज्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणत आहे त्या भागात तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करा अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.

            कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याऱ्या हॉस्पिटलमधील सुरक्षततेच्या दृष्टीने आवश्यक ते व्यवस्थापन करावे.  हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक सप्लाय बाबत आवश्यक दक्षता घ्यावी .ऑक्सिजन टाक्या  ठेवण्यात आलेल्या ठिकाणी कोणताही ज्वालागृही पदार्थ ठेवू नये,  रेमडिसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी  यावर जिल्हा सनियंत्रण समितीचे नियंत्रण आहे. सर्व हॉस्पिटलनी उपलब्ध बेड संख्या, ऑक्सिजन बेड, उपचारासाठी दाखल रुग्ण, तसेच मृत्यू रुग्णांची संख्या दररोज सुविधा पोर्टलवर भरणे आवश्यक असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सांगितले.   

            रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसोबत अनेक  नातेवाईक देखील येतांना दिसतात. त्यांच्यावर बंधन आणणे आवश्यक आहे. बाधित रुग्णांसोबत आलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून कोरोना संसर्ग वाढतो व त्याच्या मार्फत इतरही  लोक बाधित होतात. यावर निर्बध आणण्यासाठी सर्व कोविड रुग्णालयाच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या सोबत त्यांच्या नातेवाईकांना येण्यास सक्त मनाई करावी. यासाठी रुग्णालयांनी खाजगी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका कराव्यात अशा सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments