मरवडे गावातील नागरिकांचे कोरोनामुळे आरोग्य धोक्यात

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त) :- मौजे मरवडे ता. मंगळवेढा या साडे सहा हजार लोकवस्तीच्या गावामध्ये कोरोना आजाराने थैमान घातले असून मरवडे गाव दि. 20 एप्रिल रोजी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष पाच दिवस हा आदेश दडपून ठेवून कुठल्याही उपाययोजना न केल्याने गेल्या आठ दिवसांत 10 नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. कोरोनाकाळात प्रशासकीय यंत्रणेकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचे जिवीत धोक्यात आले असून या प्रकाराची चौकशी होवून तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी मंगळवेढा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अड.नंदकुमार पवार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे . मरवडे गावाचा एक कि.मी. परिघातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून दि. 20 एप्रिल पासून मा. प्रांताधिकारी यांनी घोषित केल्याच्या आदेशाची प्रत दि. 25 रोजी रात्री नागरिकांच्या माहितीसाठी सोशल मिडीयातून प्रसिद्ध केली आहे. मात्र त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही अथवा खबरदारी घेण्यात आलेली नाही याकडे निवेदनाद्वारे वरिष्ठांचे लक्ष वेधण्यात आले आहे . तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अड.नंदकुमार पवार व मरवडे ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांनी सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांशी संपर्क साधून वस्तुस्थितीची जाणिव करुन दिली आहे .
त्याचबरोबर मरवडे येथील *स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीने याबाबतीत सविस्तर निवेदन देऊन मरवडे गावातील परिस्थिती व करावयाच्या उपाययोजनांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे .......1) मयत 10 रुग्णांच्या कुटुंबाकडून मृत्यूच्या कारणांची शहानिशा व्हावी व त्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यात यावी.
2) मरवडे गाव प्रतिबंधित करण्याचा आदेश पाच दिवस दडपून ठेवण्यामागील कारणांची चौकशी व्हावी* .
3) प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा व ग्रामसुरक्षा समितीने कोणत्या उपाययोजना केल्या व खबरदारी घेतली याचा आढावा घेण्यात यावा.
4) प्रा.आ. केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या घेऊन सर्व स्टाफ पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे का ? याची शहानिशा करण्यात यावी.
5) वाढते रुग्ण व मृत्यूचे प्रमाण विचारात घेऊन खास बाब म्हणून अतिरिक्त वाढीव आरोग्य सुविधा मरवडे आरोग्य केंद्रासाठी पुरविण्यात याव्यात.
6) संस्था विलगीकरण कक्षामध्ये सुविधांच्या अभावामुळे होणारी हेळसांड थांबवावी.
7) ज्या रुग्णांना होम क्वारंटाईनची अनुमती दिलेली आहे त्यांची नियमित तपासणी व्हावी .
8) ग्रामपंचायतीने गेल्या पंधरा दिवसांत प्रतिबंधात्मक कोणत्या उपाययोजना केल्या याचा आढावा घेऊन योग्य ते आदेश देण्यात यावेत.
9) कारणांशिवाय रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
10) चाचण्यांचे प्रमाण वाढविणे , लसीकरण करणे यादृष्टीने ठोस कार्यक्रम आखण्यात यावा*.
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप स्वामी , चंचल पाटील , प्रांताधिकारी उदयसिंह भोसले , तहसिलदार स्वप्निल रावडे , जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठविण्यात आल्याचे स्वाभिमानी ग्रामाविकास आघाडीचे गटनेते तथा ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांनी सांगितले .
0 Comments