Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोल्याच्या हक्काचं एक थेंबही पाणी घेऊ देणार नाही भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांचा सरकारला इशारा

 सांगोल्याच्या हक्काचं एक थेंबही पाणी घेऊ देणार नाही भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांचा सरकारला इशारा




सांगोला (कटूसत्य वृत्त) :- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरसाठी उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मंजूर करून घेतले आहे. सांडपाण्याचं निमित्त करून स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी दुसऱ्यांच्या हक्काचं पाणी पळवून नेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याची दिशाभूल केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या भरणे मामांनी उजनीच्या पाण्याचं मालक होण्याचा प्रयत्न करून नये. उजनी धरणातील सांगोला तालुक्याच्या हक्काच्या दोन टीएमसी पाण्याचा एक थेंबही घेऊ देणार नाही, असा थेट इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिला आहे.उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी 5 टीएमसी पाणी देण्याच्या निर्णयावरून बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले की, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी नेण्याचा घाट घातला आहे.
हा निर्णय दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. सांगोला तालुक्याच्या हक्काचं दोन टीएमसी पाणी अद्यापही मिळालेलं नाही. 20 वर्षांपूर्वी उजनीचे दोन टीएमसी पाणी मंजूर असूनही सांगोला उपसा सिंचन योजनेला जाणीवपूर्वक निधी दिला नाही. सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर आता इंदापूरकरांनी डोळा ठेवला आहे. पाण्याच्या बाबतीत नेहमीच सांगोला तालुक्यावर अन्याय झाला आहे. मंजूर असलेलं पाणी देखील मिळत नसल्याची शोकांतिका आहे. उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील सिंचन योजना अपूर्ण असून त्यासाठी निधी देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. 
      उजनी धरणातील पाणी पळवून नेण्यासाठी जाणीवपूर्वक सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपदापासून डावलले आहे. सत्ताधारी पक्षाचा जिल्ह्यातील आमदार पालकमंत्री असता तर अशी वेळच आली नसती. उजनी धरणाच्या पाण्याचे वाटप यापूर्वीच झाले असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करून सांडपाण्याच्या नावाखाली 5 टीएमसी पाण्याची चोरी आम्ही कधीही खपवून घेणार नाही. तालुक्याच्या हक्काचे पाणी जर कोणी नेत असतील तर त्याला आमचा तीव्र व टोकाचा विरोध राहील, यात शंका नाही. आम्ही शेतकऱ्यांचे संसार उद्‌ध्वस्त होऊ देणार नाही. 
         सांगोला तालुक्यासाठी मंजूर असलेल्या दोन टीएमसी पाण्यातील एक थेंबही घेऊ देणार नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय भाजप कधीही सहन करणार नाही. उजनीचं दोन टीएमसी पाणी मिळालं तर सांगोला तालुक्याच्या दुष्काळी भागातील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. उद्घाटन होऊन वीस वर्षे झाली तरी एक रुपया देखील निधी दिला नाही. या योजनेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी तसेच तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments