रस्ता व महारवतनाची जमीन खोदून शेजारच्या शेतकऱ्यांनी परवानगी न घेता मुरूम विकला !

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वस्त्यांवर जाण्यायेण्यासाठी वापरात असलेला चालू रस्ता व शेजारील पडीक जमीन (महारवतनाची जमीन) खोदून इलाह खादीर सय्यद (पठाण) नामक शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता महामार्गाच्या ठेकेदारास मुरूम व लाल माती अशा प्रकारचे खनिज विकलेले आहे. तर महामार्गाच्या ठेकेदारानी सुध्दा कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता महामार्गाच्या रस्त्यासाठी छोटा रस्ता गिळंकृत करून बेकायदेशीर व अवैद्य मुरूम (खनिज) उचललेला असल्याची तक्रार बालाजी कोरकेसह परिसरातील शेतकऱ्यांनी दिल्याने पंढरपूर तहसील कार्यालयाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर या गावातील इलाहा खादीर सय्यद (पठाण) या शेतकऱ्यांनी स्वतःची शेतजमीन व फौजदार वस्तीवर जाण्यायेण्यासाठी वापरात असलेला चालू रस्ता व शेजारील पडीक जमीन (महारवतनाची जमीन) जवळपास 40 ते 50 खोली व 150 ते 200 लांबी आणि रुंदी खड्डा खोदून शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता महामार्गाच्या ठेकेदारास मुरूम व लालमाती ( खनिजे ) विकलेली आहेत. तर महामार्गाच्या ठेकेदारानी सुध्दा कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता महामार्गाच्या रस्त्यासाठी छोटा रस्ता गिळंकृत करून बेकायदेशीर व अवैद्य मुरूम (खनिज) उचललेला असल्याची तक्रार बालाजी कोरके, मीना जीवन पाटील, आशा शिवाजी वागज व निशा नितिन जठार सह परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे. परंतू संबंधित अधिकार्यांकडे ठोस अशी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसल्याने पंढरपूर तहसील कार्यालयाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.
या संबंधी खरी माहिती जाणून घेण्यासाठी दि.1/4/2021 रोजी आमची टिम घटना स्थळी गेली असता तेथे उपस्थित असलेला शेतकरी एकनाथ उत्तम कोरके यांनी आमच्या टिमशी बोलताना सांगितले की, हा जो बेकायदेशीर खड्डा खोदून अवैध मुरूम व लालमाती यासारख्या खनिजांचा उपसा केलेला आहे. त्यामुळे मानव व प्राण्यांची जिवत हानी होवू शकते त्यास कोण जबाबदार राहणार आहेत. या बेकायदेशीर पाडलेल्या खड्ड्या शेजारी कोणत्याही प्रकारचे कंपाउंड घेतलेले नाही. त्यामुळे तेथे खेळताना लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तीचा तोल गेल्यास किंवा लागतच असलेल्या रस्त्यावरून रात्री अपरात्री ये जा करताना कोणीतरी घसरून पडल्यानंतर किंवा गाय, म्हैस यासारखा कोणताही प्राणी पडल्यानंतर जिव जावू शकतो. तसेच बाजूला असलेल्या पखालपूर पंढरपूर हा रस्ता असून या रस्त्यावरून एस. टी. बस या सारख्या वहानांची ये जा होत आहे. व त्याच रस्त्यावरून वीजपुरवठा करणार्या तारा गेलेल्या आहेत. त्या तारांना खड्ड्यातील पोलचा आधार आहे. मात्र पोलाच्या दीड ते दोन फुट गोल आकाराचा व 15 ते 20 फुट उंच मुरूम काढल्यामुळे तो वीजेचा पोल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. त्यामुळे वीजेचा धक्का लागून जिवितहानी ही होवू शकते. पुढील अनार्थ टाळण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी लवकरात लवकर कारवाई करणे गरजेचे आहे.
बालाजी कोरके म्हणाले की, या खड्ड्यामुळे माझ्या घराला व घरातील व्यक्तींना धोका निर्माण झाला आहे. तरीही तो खड्डा लवकरात लवकर बुजवून आमच्या शेतात व वस्त्यांवर पूर्वी होता तो रस्ता करून द्यावा.
तर असे बेकायदेशीर कृत्य करणार्या ठेकेदार व शेतकरी यांच्यावर दंडात्मक करून संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी आणि आमच्या शेतात व आमच्या वस्त्यांवर पूर्वी होता तो रस्ता करून द्यावा. अशी मागणी मीना जीवन पाटील, आशा शिवाजी वागज व निशा नितिन जठार सह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आमच्या कार्य क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचा मुरूम ( खनिजे) उचलण्यासाठी परवानगी दिल्याबाबत आम्हांला वरीष्ठांकडून कधीही कळविले जात नाही. मात्र संबंधित मुरूम उपसा करण्याच्या सुरवातीस मला तेथील शेतकर्यानी कळविल्यानंतर मुरूम उपसा थांबविला होता. परंतू सर्कल आवसेकरांनी फोनवरून सांगितले की, संबंधित ठेकेदारानी परवानगी घेतली आहे त्यांना मुरूम घेऊन जावू द्या. - तलाठी, दादासाहेब पाटोळे
संबंधित मुरूम उपसा संबधी शेतकरी व ठेकेदारांनी काही दिवस पूर्वी अर्ज दिल्याचे मला माहिती आहे. परंतू त्यांना परवानगी दिली आहे का नाही हे मला माहिती नाही. आज तहसील कार्यालय बंद असल्याने माहिती मिळू शकत नाही मात्र सोमवारी माहिती घेऊन नक्की कळवितो. जर परवानगी दिलेली नसेल तर संबंधित शेतकरी व ठेकेदारावर नक्की कारवाई केली जाईल. तसेच त्यांनी किती ब्रास मुरूम उपसा केला? कोणाच्या शेतातून केला? वीजेच्या पोलमुळे व खड्ड्यामुळे कोणा कोणास धोका निर्माण होऊ शकतो याबाबत चौकशी करून लवकरच कारवाई केली जाईल. - सर्कल, बाळासाहेब आवसेकर
मी घटना स्थळाची पहाणी करून लवकरच शेतकरी व ठेकेदारांनी वीजेच्या पोलला धोका निर्माण केल्याने जिवितहानी होवू शकते का नाही हे पाहून वरिष्ठांना कळविणार आहे. - वायरमन, कदम
मी ही परवानगी घेण्यासाठी ठेकेदाराचे मुकादम व्यावहारे नामक व्यक्तीस कागदपत्रे दिलेली आहेत. त्यांनी परवानगी घेतली आहे का नाही हे माहित नाही. मात्र वीजेचा पोल काढून दुसरीकडे बसविण्यासाठी मी कदम वायरमन व त्याच्या साथीदारांनी अनेकदा सांगितले आहे. - शेतकरी, इलाह खादीर सय्यद
1) संबंधित शेतकर्यानी स्वतःच्या शेतजमीनीची मोजणी केली आहे का?
2) ठेकेदारास फौजदार वस्तीवर जाणार रस्ता दिसला नाही का?
3) तलाठी पाटोळे यांना सर्कल आवसेकरांनी कोणत्या आधारे सांगितले होते संबंधितानी मुरूम उपसा करण्याचे परवानगी घेतली आहे.
4) बेकायदेशीर व अवैध खनिजे उचलल्या प्रकरणी कोणा, कोणावर तहसीलदार कोणती कारवाई करतात.
5) बेकायदेशीर व अवैध मुरूम व लालमाती यासारख्या खनिजांचे उत्खनन हे शेतकरी, ठेकेदार, कर्मचारी व अधिकारी यांच्या सर्वांच्या संगनमतानेच झालेले आहे.
0 Comments