Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षण विभागातील कलापथक करीत आहे, कोरोनाविषयी जनजागृती गुरुजींच्या कला कौशल्याचे गावांतून होत आहे कौतुक

 शिक्षण विभागातील कलापथक करीत आहे, कोरोनाविषयी जनजागृती गुरुजींच्या कला कौशल्याचे गावांतून होत आहे कौतुक



सांगोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राला प्रबोधनाचा मोठा वारसा आहे.संत तुकारामांपासून संत गाडगेबाबा यांच्यापर्यंतचा हा प्रबोधनाचा वारसा घेत  सीईओ दिलीप स्वामी, सोलापूर जिल्हा परिषद आणि सांगोला पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव व गटविकास अधिकारी संतोष  राऊत  यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना जनजागृती अभियानामधून गावोगावी लोकांचं कोरोना या महामारी पासून बचाव करण्यासाठी शिक्षण विभागाचं एक पथक गेल्या पंधरा मार्चपासून प्रबोधन करत आहे.*  
    मार्च एप्रिलच्या रखरखत्या उन्हात अख्खं जग जिंकायला निघालेल्या सिकंदरच्या आवेशात शिक्षण विभागाचं हे कलापथक गावोगावी जाऊन कोरोनाची जनजागृती करीत लोकांमध्ये या आजाराचे गांभीर्य लक्षात आणून देवून काळजी घेण्याचे आवाहन करत आहे.ही कामगिरी वाटते इतकी सोपी नाही.उन्हातान्हात,खाचखळग्यांचे रस्ते तुडवत कोणती सोय असो नसो कोणतीही तक्रार न करता अखंड ही मोहीम राबविण्यात सर्वच सदस्यांचे अमुल्य योगदान  आहे.
   आमच्या कलापथकाचे प्रमुख आहेत प्रती सुरेश वाडकर सुभाष भंडगे अक्षरश: सुरेश वाडकर साक्षात गात आहेत असा आवाज आणि त्याचबरोबर सर्वांना सोबत घेऊन सर्व अडिअडचणींवर मात करत सतत हसतमुख राहून गेली कित्येक वर्षे कलापथकाची धुरा सांभाळत असलेले व सध्या हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी दर्जेदार करण्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे.सुंदर हार्मोनियम वादक आणि तेवढेच प्रभावी प्रवचनकार असलेले सुभाष सर हा कार्यक्रम आपल्या कलेने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
   दुसरे या कार्यक्रमासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे एकनाथ गुरव.कुठलाही शिक्षण विभागाचा संगीत विषयक कार्यक्रम असो , खुप वर्षांपासून तबला हा गुरव सरांचाच असतो.अतिशय सुंदर तबला वादन आणि त्याचबरोबर कार्यक्रम पार पाडण्यासाठीचं सुक्ष्म नियोजन करण्यापासून ते कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये गुरव सरांचं योगदान खूप मोठे आहे.सध्या सर्वांना स्वतःची गाडी घेऊन गावोगावी पोहोचवणं ,आणणं हे पदरमोड करून आनंदाने करणं हे खूप मोठं काळीज असणार्या माणसाचंच काम आहे.स्वत:चं मोठेपण , योगदान हे भरभरून देवून ही कधी एका शब्दानं श्रेय न घेणारे असे एकनाथ गुरव सध्याचा कार्यक्रम दर्जेदार आणि सुंदर करण्यामध्ये या दोघांचं योगदान खूप मोठं आहे.
  त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी धडपडणारे आणखीही काही सदस्य आहेत.त्यापैकी नवघरे सरांचे प्रवचन व त्यांचा प्रभावी अभिनय,केंगार गुरुजींची सुरेल सुंदर सुंद्री, समाधान ढेकळे सरांची सुमधुर बासरी, शिवाजी गुळीग  कडकडणारी ढोलकी यांमुळे हा कार्यक्रम आणखी रंगतदार बनत जातोय.आणि या कार्यक्रमासाठी पहिल्या पासूनच धडपडणारे उत्साही व्यक्तिमत्त्व म्हणजे कृष्णदेव शिंदे.हे रोज कराओके बाॅक्स घरी नेऊन रिचार्ज करून कार्यक्रमासाठी घेऊन येतात.आणि साऊंड सिस्टीम मध्ये कुठं काय करायचं हे सगळं बघत बघत स्वतः विविध लोकगीतांच्या चालींवर बसवलेली कोरोना गीते प्रभावीपणे गाऊन गावोगावीच्या लोकांची शाबासकी मिळवतात.त्याचबरोबर स्वतः कोरोना गीते लिहून सादर करणारे पांडुरंग कोकरे सर.कुठल्याही प्रकारची गाणी लिलया गाणारे अशोक शिंदे,अभंगातून संदेश देणारे तानाजी गायकवाड, श्रीनिवास हातेकर यांचं गायन कार्यक्रमात विविधता निर्माण करतं आहे.विलास कांबळे सर यांच्या कविताही छान आहेत.आणि किशोर कोरंडीकर या नव्या दमाच्या शिक्षकाचं सुत्रसंचलन कार्यक्रमाची उंची वाढवत नेतं.सुरवातीला हा कार्यक्रम एका दिवशी तीन गावांमध्ये व दररोज नियोजित होता.त्यामुळे सर्वच सदस्यांची तापलेल्या उन्हात प्रचंड धावपळ,दगदग होत होती.परंतु तसं कुठेही न दाखवता सर्वच सदस्य कार्यक्रम प्रत्येक गावात जास्तीत जास्त सुंदर आणि उद्बोधक कसा होईल यासाठीच झटत होते.काही ठिकाणी या कलापथकाचे स्वागत उत्साहाने झाले.कौतुकही मुक्तहस्ते करण्यात आले.तर काही गावी काही कटू अनुभवही आले.पण झाले गेले विसरून जावे याप्रमाणे हे कलापथक गेल्या पंधरा मार्चपासून ते एप्रिल अखेरपर्यंत आपल्या प्रबोधनाचा यज्ञ गावोगावी जाऊन सुरूच ठेवणार आहे.तुमच्या गावीही ही टीम येईल तेव्हा त्यांना कोणतीही अपेक्षा नाही.फक्त तुमच्या टाळ्या आणि कौतुक आणि तुम्ही नियम पाळून काळजी घ्यावी एवढीच माफक अपेक्षा या टिमची आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments