Hot Posts

6/recent/ticker-posts

कोविड रुग्णांना रुग्णालयातच रेमडेसिव्हर दिले जाईल - प्रांताधिकारी शमा पवार

 कोविड रुग्णांना रुग्णालयातच रेमडेसिव्हर दिले जाईल - प्रांताधिकारी शमा पवार       


 


अकलूज (कटूसत्य वृत्त):- कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून माळशिरस तालुक्यातील कोविड रुग्णांना आता रुग्णालयातच हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाईल अशी माहिती अकलूज उपविभागाच्या प्रांताधिकारी शमा पवार यांनी दिली. 
माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या तालुक्यातील १२ कोविड रुग्णालयात २६३ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे दररोज सुमारे २६३  रेमडेसिव्हिर इंजेक्शन या रुग्णांना पुरवठा करावे लागत आहे. तालुक्यात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा करणारे चार  स्टॉकीस्ट आहेत. या चार  स्टॉकीस्ट मार्फत तालुक्यासह इतर तालुक्यात व जिल्ह्यात रेमडेसिव्हरचा पुरवठा केला जातो.  हे इंजेक्शन व इतर सुविधा मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मात्र धावपळ होते. ही धावपळ व रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रांताधिकारी शमा पवार यांनी तालुक्यातील चार स्टॉकीस्ट बरोबर बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील कोवीड रुग्णालयांना रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा करणे,  त्याचा दैनंदिन अहवाल या कार्यालयास देणे बंधनकारक करण्यात आले. हे इंजेक्शन कोवीड रुग्णांना त्यांच्या रुग्णालयात पुरवठा करण्यासाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्रेणिक शहा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.  
माळशिरस तालुक्यात १२ कोवीड रुग्णालये असून अकलूज मध्ये डॉ एम के इनामदार, डॉ विवेक गुजर, सन्मती, हेगडे, अकलाई, अभय,  क्रिटीकेअर व  कदम हॉस्पिटल, नातेपुते येथे अश्विनी हॉस्पिटल, श्रीपूर येथे श्रेयश व निदान हॉस्पिटल ही खाजगी रुग्णालये असून माळशिरस येथे शासकीय ग्रामीण रुग्णालय व महाळुंग येथे प्राथमिक आरोग्य केंद्र ही दोन शासकीय कोवीड रुग्णालये आहेत. तालुक्यात सध्या कोवीडचे ७२५ रुग्ण असून तालुक्यासह इंदापूर, फलटण, माण, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, आटपाडी व माढा या लगतच्या तालुक्यातूनही कोवीडचे रुग्ण उपचारासाठी माळशिरस तालुक्यात येत असल्याने तालुक्यातील कोवीडची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. 
माळशिरस तालुक्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात सुमारे ७२५  रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना संजीवनी ठरलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा मागणीपेक्षा कमी प्रमाणात होत असल्याने हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत होती. ९०० ते १२०० रुपये किमतीचे हे इंजेक्शन काळाबाजारात सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत विकले जात होते. जादा पैसे देवूनही इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. केंद्र सरकारने रेमडेसिव्हर इंजेक्शनची परदेशात होणारी निर्यात बंद करुन भारतातील रुग्णांना ते मिळावेत या हेतूने देशात उपलब्ध करुन दिल्याने व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केल्याने आता कोवीड रुग्णांची गैरसोय दुर होणार आहे व यामध्ये होणारा काळाबाजार थांबेल असे प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले. 
या बैठकीस तहसीलदार जगदीश निंबाळकर, नायब तहसीलदार तुषार देशमुख, एन . डी . काळे, अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्रेणिक शहा यांच्यासह रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा करणार स्टॉकीस्ट उपस्थित होते. 
 माळशिरस तालुक्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे.  रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हाधिका-यांनी समिती गठीत केली आहे  तालुक्यातील चार स्टॉकीस्टना तालुक्यातच रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास प्रांताधिकारी शमा पवार यांनी सूचना दिल्या आहेत . त्यादृष्टीने इंजेक्शन उपलब्ध होताच प्रांताधिकारी कार्यालयास कळविले जाईल व त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल. 
प्रद्युम्न गांधी 
अध्यक्ष , केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन


Reactions

Post a Comment

0 Comments