मोहोळ नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडूनच्या उमेदवार यादीकडे कार्यकर्त्यांचे लक्षकाहींना मिळणार पुन्हा संधी तर अनेकांचा होणार पत्ता कट
मोहोळ ( कटुसत्य वृत्त ) :- येत्या काळात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी आपापले राजकीय देव पाण्यात ठेवले आहेत. मात्र पक्षश्रेष्ठी राजन पाटील हे शहरातील प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून सर्व स्तरातील नागरिकांची चर्चा करूनच पक्षाच्या उमेदवारी जाहीर करणार असल्याचे अधिकृत वृत्त आहे. सध्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागणीला चांगलाच जोर चढला असून अनेकांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.
गत पाच वर्षाच्या नगरपरिषदेच्या कारभारामध्ये जरी माजी आमदार राजन पाटील मोजक्याच विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी आले असले तरी कोणी कोणत्या प्रभागात कोणत्या दर्जाची कामे केली याची तंतोतंत माहिती त्यांना उपलब्ध असते. त्यामुळे काही प्रभागातील कामाबाबत निश्चितपणे पक्षश्रेष्ठींना स्थानिक कार्यकर्त्यांनी अवगत केले आहे. त्यामुळे यापुढील काळातील सत्ता कालावधीत सर्वसामान्यांशी प्रामाणिक नाळ असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे समजते. काही पदाधिकाऱ्यांनी अनेक गमतीजमती केल्याचेही पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले आहे. जरी पक्षश्रेष्ठी बोलून दाखवत नसले तरी येत्या काळातील उमेदवारी निश्चितीच्या निर्णय प्रक्रियेत त्याचे पडसाद नक्कीच उमटू शकतात. त्यामुळे उमेदवारी निश्चितिच्या वेळी पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेणार ? कोणाचा पत्ता कट करणार ? कोण पुन्हा कोणाला संधी देणार ?आणि कोणाला घरी बसवणार याकडे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
राजन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या ठेकेदारी प्रगतीच्या अंकशास्त्राचा हिशोब जरी काहीसा कमी असला तरी त्यांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी कोणत्या पक्षाला मदत केली आणि पक्षाच्या विरोधात काय काय गमती जमती केल्या याचा ६ ड त्यांच्या मनात अगदी सुरक्षित करून ठेवलेला असतो. त्यामुळे त्यांनी तालुक्यासाठी मोहोळ शहरासाठी काय केलं ? अशा कितीतरी गप्पागोष्टी विरोधक करत असले तरी राजन पाटलांनी मोहोळ शहरासाठी काय केलं ही बाब जुन्या जाणकार नेतेमंडळींना चांगलीच अवगत आहे.
कोंबडी आधी की अंडे आधी मतदान अगोदर की विकास आधी या तर्कशास्त्रामध्ये त्यांनी कधीही रस दाखवला नाही. जे पण काही मुठभर कार्यकर्ते असतील त्यांची निष्ठा पारखुन त्यांच्या प्रामाणिकपणाची वेळोवेळी कदर केली. आज जी तालुकाभर विविध पदे भूषवणारी मंडळी आहेत ती राजन पाटील यांनी दिलेल्या संधीमुळे त्या पदावर पोहोचू शकली हे कुणीही नाकारू शकत नाही.
मात्र मोहोळ तालुक्याच्या राष्ट्रवादीची अभेद्य भिंती शाबूत ठेवणाऱ्या राजन पाटील यांना भाजप सत्ता कालावधीत अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांचे वैयक्तिक नुकसान होईल यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र पक्षश्रेष्ठी शरदचंद्र पवार यांच्यावर असलेल्या अजोड निष्ठेच्या पाठबळावर त्यांनी अशा अनेक संकटावर त्यांनी मात केली. त्यामुळे येणारा काळ जरी आव्हानाचा असला आणि जरी मुठभर कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला तरी हजारो निष्ठावंत आणि निरपेक्ष भावनेने राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर ते या पुढील काळातही मतदारसंघाची सत्तासूत्रे ताब्यात ठेवतील याबाबत तीळमात्र शंका कोणालाही वाटत नाही.
राजन पाटलांचा स्वभाव सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नाही. ते चुका करणाऱ्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून मुक्तकंठाने कौतुक करायला लागले की ओळखून घ्यायचं तो कार्यकर्ता काही तर चुकीच वागायला लागला आहे. बर्याचदा संयमी स्वभावामुळे ते मनात असलेल्या गोष्टी बोलून दाखवत नाहीत. आणि घडलेल्या गोष्टीवर सहसा कटू भाष्य कधी करत नाहीत. मात्र ते कधी कार्यकर्त्याचा नेता करतील आणि नेत्याचा कधी पुन्हा कार्यकर्ता करतील हे भल्याभल्यांच्या अजूनही ध्यानात आले नाही. त्यामुळेच तालुक्याच्या राजकारणात शिवसेनेसारख्या पक्षातून अनेक जण राष्ट्रवादीत आले आणि पदे घेऊन पुन्हा विरोधी पक्षात गेले. तरीही या बाबतची सूप्त नाराजी त्यांनी कधीही कोणाजवळ बोलून दाखवली नाही. प्रांजळ आणि निर्मळ मनाचे राजकारण कुठे करायचे याचे तंतोतंत ज्ञान त्यांना माहिती आहे त्यामुळेच सर्व पक्षीय राजकारणात ते आजवर अजातशत्रू राहू शकले.
0 Comments