विरोधात कोण आहे हे न पाहता मी विकासासोबत आहे हे जनतेला दाखवणार - उपनगराध्यक्ष उमेदवार प्रमोद डोके
मोहोळ (कटूसत्य वृत्त ):- मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या आरक्षण सोडतीनंतर माझा यापूर्वी निवडणूक लढवलेला प्रभाग क्रमांक बारा हा आरक्षित झाला आहे. वास्तविक पाहता सध्या मी मोहोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावर कार्यरत आहे . प्रभाग क्रमांक १२ मध्ये विकास कामे पूर्ण केल्यामुळे त्या प्रभागातील माझ्या कामाबद्दलची विश्वासार्हता नक्कीच वाढली. निवडणुकीत विजय झाल्यानंतर माझ्या समोर विकासाची मोठी जबाबदारी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माझी राजकीय मार्गदर्शक आणि माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत तात्या माने यांनी मोठ्या विश्वासाने मला उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या पूर्वीदेखील एक दक्ष नगरसेवक या नात्याने प्रभाग बारा मधील रस्ते पाणी आरोग्य स्वच्छता विषयक सर्व प्रश्न सोडवल्याचे संपूर्ण शहराने पाहीले आहे.
माझा 12 क्रमांक चा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने मी कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.आता प्रभाग क्रमांक 14 हा सर्वसाधारण खुला झाल्यामुळे या प्रभागातून मी निवडणूक लढवण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. याबाबत राष्ट्रवादी पक्षाकडे रितसर मी उमेदवारी मागणीचा अर्ज देखील दाखल केला आहे. वास्तविक पाहता प्रभाग क्रमांक 14 हा माझा होमपीच असलेला प्रभाग आहे. कारण या प्रभागात तच आमच्या संपुर्ण डोके परिवाराचे मतदान देखील आहे. मला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यास मी हि निवडणूक नक्की लढवणार आहे असेही प्रमोद डोके यावेळी म्हणाले.
विरोधी पक्षाकडून अमुक अमक्याला उमेदवारी मिळणार त्यांना या पक्षाकडून तिकीट मिळणार असे इतर विविध पक्षांचे पदाधिकारी निवडणुकीत उतरणार अशा आशयाच्या चर्चा मी प्रसारमाध्यमांमध्ये वाचल्या. वास्तविक पाहता माजी स्पर्धा कोणाशीही नाही आणि यापूर्वी देखील नव्हती. यापूर्वीच या निवडणुकीत ज्यांना मी पराभूत केले त्या सर्वांशी ही मी अतिशय शांततेने आणि संयमाने आजवर पाहत आलो आहे. संयमाने आणि शांततेने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याची माझी जबाबदारी मी निश्चितपणे पार पाडण्यासाठी वचनबद्ध राहणार आहे. त्यामुळे माझ्या विरोधात कोण उभा आहे हे न बघता केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून प्रभाग क्रमांक 14 हा सर्वच मुद्द्यावर सर्वांगीण विकसित प्रभाग बनवण्यावर माझा भर असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर आपण सर्वसामान्यांच्या समोर जाणार असून पक्षाने संधी दिल्यास याच प्रभागातून आपण निवडणूक लढवणार असल्याचेही यावेळी प्रमोद डोके म्हणाले.
आजवर मोहोळ शहराच्या विकासासाठी कोणत्या पक्षाने काय केले? हे सर्व शहरवासीयांनी पाहिले आहे. मोहोळ शहराच्या विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे नगरपरिषदेच्या सत्ता कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांनी भरीव निधी शहरासाठी खेचून आणला. वास्तविक पाहता मोहोळ शहराच्या विकासाचे श्रेय हे कोणत्या पदाधिकाऱ्यांना न जाता ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे आम्हाला देखील मान्य आहे. ती कामे कोणी केली हे देखील सर्वांना माहिती आहे. मात्र उर्वरित ठिकाणी चांगल्या दर्जाचे रस्ते पाणीपुरवठा योजना,वृक्षारोपण त्याचबरोबर इतरही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागल्याचे सर्व जण पाहत आहोत. स्मशानभूमी बरोबर मोहोळ शहरातील अन्य महत्त्वाचे प्रश्न देखील मार्गी लागत आहेत ही समाधानाची बाब आहे या पुढील काळातही मोहोळ शहराच्या विकासाचा उर्वरित टप्पा पूर्ण करण्यासाठी मा.आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सोबतच मोहोळची जनता राहील असा मला विश्वास वाटतो.
प्रमोद बापू डोके
उपनगराध्यक्ष
तथा विद्यमान नगरसेवक
प्रभाग क्रमांक 12
0 Comments