संत रविदास महाराज सर्वात तेजस्वी तारा - इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे
टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त ) :- संत तुकाराम महाराज,संत कबीर,संत नामदेव,संत नरसी मेहता,संत नरहरी अशा सर्व श्रेष्ठ संतांच्या तारा मंडळातील सर्वात तेजस्वी तारा म्हणजे संत रविदास महाराज हे होय असे प्रतिपादन प्रख्यात इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी केले.
माढा तालुक्यातील भुईंजे येथील रविदास महाराज मंदिरात संत रविदास महाराज यांच्या ६४४ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संत रविदास महाराज मंदिराचे मुख्य प्रवर्तक राजाभाऊ शिंदे यांनी अरदास,आरती म्हटली.तसेच प्रख्यात व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते रविदास महाराज यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. तर पं.स.समिती सदस्य वैभव कुटे हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी पुढे मार्गदर्शन करताना व्याख्याते श्रीमंत कोकाटे म्हणाले की,रविदास महाराज हेही संत नामदेवांप्रमाणे शीख धर्मीयांवर प्रभाव टाकणारे समर्थशाली,प्रभावी व्यक्तिमत्व होते.त्यांनी मानसिक गुलामगिरीतुन शूद्रादी-अतिशूद्रांना मुक्त करण्याचे महान कार्य केले.अशा लोकांना वर्ण व्यवस्थेने ज्ञानाचा अधिकार नाकारलेला होता.यामुळे त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याचे कार्य केले.'मन चंगा तो कटोती मे गंगा' हा मूलमंत्र देऊन महाराजांनी मन स्वच्छ असेलतर गंगेत स्नान करण्याची गरज नाही हे पटवून दिले.यावेळी त्यांनी अंग स्वच्छ होईल मनाचे असा प्रश्न उपस्थित केला.त्यांनी सांगितले की,संत कबीर,संत रविदास महाराज,संत तुकाराम महाराज हे क्रांतिकारी संत होते.त्यांनी समतेचा अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा संदेश दिला. स्वर्ग,नरक या भ्रामक कल्पना नाकारल्या आहेत.पुनर्जन्म कदापि नाही हे जीवनच श्रेष्ठ आहे,याचा आनंद घ्या ही शिकवण दिली आहे,याचे पालन करावे असे सांगितले.जिवंतपणीच आई-वडिलांना सांभाळावे,पैसा कमवा पण समाजासाठी सत्कर्म करा असा सल्ला दिला.
डॉ.कोकाटे म्हणाले की,धर्माच्या नावाखाली महिलांना प्रेताबरोबर जाळले जायचे.म.जोतिबा फुले,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांवर होणारे अत्याचार थांबावेत यासाठी शाळा सुरू करून महिलांना समतेचा अधिकार दिला.माता जिजाऊ,अहिल्याबाई होळकर या सती गेल्या नाहीत,त्यांनी धर्माच्या बेड्या झुगारल्या आहेत.
भुईंजे हे रविदास मंदिर संत रविदास महाराज यांच्या साहित्याचे अभ्यास केंद्र व्हावे ही संकल्पना मांडली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजा बोबडे,कैलास सातपुते,महेंद्र वाकसे,महादेव गायकवाड,सरपंच अजिनाथ कांबळे,कृषी अधिकारी अनिल कांबळे,नागनाथ शिंदे,नवनाथ नांगरे,रत्नमाला शिंदे,संजीवनी अरबोळे,किरण लोंढे आदीजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments