वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यास 31 मेपर्यंत मुदतवाढ
सोलापूर (कटुसत्य वृत्त ) :- वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमागधारकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यास 31 मे 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उप आयुक्त चंद्रकांत टिकुळे यांनी दिली आहे.
राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना 21 डिसेंबर 2018 अन्वये वीजदर सवलत लागू केली आहे. वीजदर सवलतीला पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https:www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत देण्यात आली होती. मात्र उद्योग संघटना, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात येत आहे. यंत्रमाग घटकांनी 31 मे 2021 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन टिकुळे यांनी केले आहे.
नोंदणी केलेली नसल्याने 27 अश्वशक्तीपेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांनी ऑफलाईन सादर करावयाचे अर्ज वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून आयुक्त वस्त्रोद्योग, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे सादर करू शकतात.
मुदतवाढीमध्ये संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज सादर न केल्यास वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असेही टिकुळे यांनी कळविले आहे.
0 Comments