मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील राजकारणात गाडे परिवार सक्रीय
युवा उद्योजक अनिल गाडे यांच्या उमेदवारीची चर्चा
प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत
मोहोळ (साहील शेख):- मोहोळ शहराच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला भाग म्हणजे मोहोळ शहराचा दक्षिण हद्दवाढ भाग. या प्रभागात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक १३ ,१४, १५ आणि १६ या चार प्रभागांचा समावेश होतो. सध्या या तीन प्रभागातील एक प्रभाग राष्ट्रवादीच्या तर दोन प्रभाग शिवसेनेच्या ताब्यात आहेत. मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाच्या सोयीनुसार उमेदवारी घेण्यासाठी अनेक दिग्गजांनी बाह्या सरसावल्याचे जाणवत आहे.
गतवेळी शिवसेनेकडून उमेदवारी मिळूनही पक्षीय समन्वयाचा मोठा फटका गाडे यांना बसल्यामुळे केवळ चार मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे निवडणुकीच्या निकाला पासून गाडे हे राजकारणापासून दूर असले तरी प्रभागातील समस्या सोडवण्याच्या कर्तव्यापासून दूर नव्हते.
सध्या प्रभाग क्रमांक १४ मधून अनेक दिग्गज रथी-महारथी उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवाय प्रभागाच्या बाहेरचे गेटकेन उमेदवार देखील आपापले सुरक्षित राजकीय पुनर्वसन करण्यासाठी या प्रभागात ओढून ताणून संपर्क वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र प्रभागातील सर्वसामान्य जनतेला स्थानिक आणि सक्षम उमेदवारांची आवश्यकता भासत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रभागातील शेकडो युवकांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी अनिल गाडे यांची भेट घेऊन त्यांनी निवडणूक लढवावी अशी विनंती केली. याबाबत गाडे यांनी काहीही निर्णय दिला नसला तरी या प्रभागातून कोणत्याही दिग्गज पक्षाकडून अनिल गाडे यांच्या नावाला पसंती मिळू शकते. त्यामुळे या प्रभागातून विजयी उमेदवारीसाठी अनिल गाडे हेच प्रबळ दावेदार ठरू शकतात. अनिल गाडे आणि त्यांचे बंधू दिनेश गाडे यांचे विविध व्यवसायाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक १४ मध्ये सर्वसामान्य नागरिकांशी अत्यंत आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. प्रभागातील कुटुंबांच्या अडीअडचणीला गाडे परिवार धावून जात असल्यामुळे या प्रभागाचे नेतृत्व गाडे यांनीच करावे अशी अनेकांची इच्छा आहे. याबाबत लवकरच एक शिष्टमंडळ प्रमुख पक्षांच्या नेत्यांना भेटणार असल्याचे समजते. दक्षिण भागातील राजकारणात गाडे यांची सक्षम उमेदवारी आल्यास निश्चितपणे आजूबाजूच्या प्रभागातही वातावरण निर्मिती होण्यास त्यांना उमेदवारी देणाऱ्या पक्षास मोठी मदत होणार आहे हे मात्र नक्की.
या प्रभागातील मतदार बांधव अत्यंत संवेदनशील मनाचे आणि जागृत असल्यामुळे गेल्यावेळी तुल्यबळ लढत होऊन या प्रभागातून केवळ चार मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्चना वायचळ या विजयी झाल्या होत्या. शिवसेनेच्या उमेदवार शालन गाडे यांचा केवळ चार मतांनी पराभव झाला होता. या नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर कोणाबद्दलही नाराजी व्यक्त न करता गाडे परिवार मोहोळ शहराच्या राजकारणापासून चार हात दूरच होता. गाडे परिवारातील अनिल गाडे आणि दिनेश गाडे हे दोन बंधु हॉटेल आणि गूळ प्रक्रिया व्यवसायात उतरल्यामुळे आपापल्या उद्योगविश्वात ते व्यस्त आहेत. तरीही प्रभाग क्रमांक १४ मधील सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही.प्रभाग क्रमांक १४ मध्ये गाडे परिवाराला मानणारा मोठा वर्ग असून देखील गाडे परिवाराने कधीही प्रभागात राजकीय शक्तिप्रदर्शन केले नाही. संयमी आणि सूचक स्वभावामुळे गाडे बंधू मतदारांमध्ये संपर्क टिकवून आहेत. गेल्या काही वर्षापासून प्रभागातील युवकांना विविध व्यवसायात उभे राहून त्यांना स्वावलंबी बनवण्यामध्ये अनिल गाडे परिवाराचे योगदान मोठे आहे. त्यामुळे गाडे यांना उमेदवारी मिळाल्यास या प्रभागातील राजकीय समीकरणे नक्कीच बदलू शकतात.
0 Comments