घरकुल उभारणीचे उद्दिष्ट्य वेळेत पूर्ण करा : पालकमंत्री
सोलापूर, (कटूसत्य. वृत्त.): महाआवास अभियानातून जिल्ह्यातील घरकुल उभारणीचे उद्दिष्ट्य वेळेत पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या.
श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाआवास अभियान कार्यशाळा झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेत झालेल्या या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, समाजकल्याण सभापती संगिता धांडोरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, समाजातील गरीब घटकांना घरकुल देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभियान सुरु केले आहे. या अभियानातून जिल्ह्यातील प्रत्येक गरजूला वेळेत घरकुल मिळेल यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, त्याची अंमलबजावणी करुन अभियानाच्या समारोपापूर्वी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुल मिळेल याकडे सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
लाभार्थ्यांना घरकुलाबरोबरच मनरेगा, उज्वला गॅस योजना, वीज जोडणी, नळ पाणी कनेक्शन, शौचालय आदी योजनांचाही लाभ द्यायचा आहे. त्यामुळे संबंधित विभागानी त्यानुसार नियोजन करावे. अभियानात घरकुल लाभार्थ्यांचा समावेश करण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, घरकुल मार्टची उभारणी करावी आणि महिला बचतगटांचा सहभाग वाढवावा, असेही श्री भरणे यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घरकुलाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद सर्वतोपरी पर्यंत करीत आहोत. त्यासाठी जिल्हा परिषदने नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे, असे सांगितले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी प्रस्तावना केली. त्यांनी महाआवास अभियानाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, राहुल देसाई, स्मिता पाटील, जस्मिन शेख, अभियंता प्रदीप कुलकर्णी, बसवराज भेंडी, आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुदती अगोदर घरकुल पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या गटविकास अधिकारी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0 Comments