नगरपालिका झाल्यानंतर बुध्दविहाराचा प्रश्न तात्काळ मार्गी लागेल - शिवतेजसिंह

अकलूज ग्रामपंचायतीकडून सर्व कायदेशिर बाबींची पूर्तता; प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित
अकलूज (कटूसत्य. वृत्त.): बौध्द बांधवांच्या जिव्हाळ्याचा असलेला बुध्द विहाराचा प्रश्न सोडविण्यासाठी अकलूज ग्रामपंचायतीने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली असून सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबीत आहे. दरम्यान अंतिम टप्प्यात असलेली अकलूजला नगरपालिकेची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रश्न तत्काळ मार्गी लागेल असा विश्वास अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी बौध्द बांधवांशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड, दादा मोरे, विशाल मोरे, किरण धाईंजे, प्रविण साळवे, विशाल फुले आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवतेजसिंह म्हणाले, अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या बुध्द विहाराचा प्रश्न आम्ही सातत्याने पाठपुरावा करून सोडवण्याचा प्रयत्न केला. स्मशानभूमीसाठी आरक्षीत असलेल्या जमिनीपैकी 40 गुंठे जागा बुध्दविहारासाठी मिळवून देण्यासाठी ग्रामसभेची मंजुरी घेवून तहसिल कार्यालय, प्रांतअधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना समक्ष भेटून या प्रकरणातील सर्व बाबी समजून सांगितल्या. त्यावेळी त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देवून याबाबत राज्यसरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातच अडकल्याने पुढे कार्यवाही झाली नाही. आता अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया शासन दरबारी अंतिम टप्प्यात आहे. अकलूज नगरपंचायत झाल्यानंतर त्याचे संपूर्ण अधिकारी मुख्याधिकारी यांच्याकडे राहतील. त्यामुळे मुख्याधिकार्यांमार्फत हा प्रश्न तात्काळ मार्गी लागू शकेल यासाठी आपण सर्वजण पाठपुरावा करू असे शिवतेजसिंह यांनी सांगितले.
0 Comments