सर्वसामान्यांच्या सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहणाऱ्या लोकनेत्याचा हृदयस्पर्शी प्रसंग..!

97 वर्षीय पापामियांना भेटून दिपकआबांनी जागवल्या माणूसकीच्या आठवणी..!
सांगोला (कटूसत्य. वृत्त.):- जवळ्याचे साळुंखे-पाटील कुटुंबीय नेहमीच परोपकार आणि जनसेवेसाठी सर्वत्र ओळखले जातात. स्व.काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्यापासून समाजसेवेची चालत आलेली निरंतर परंपरा आजही दिपकआबा साळुंखे पाटील व पुढे चि.यशराजे तितक्याच तळमळीने व प्रामाणिकपणे जोपासत आहेत. संपूर्ण सांगोला तालुक्यात राजकारण व समाजकारण च्या माध्यमातून साळुंखे पाटील कुटुंबीयांनी आपल्या विचारांशी आणि भावनेशी जोडलेल्या कार्यकर्त्यांची एक फलटणच उभा केली आहे. या कार्यकर्त्यांशी साळुंखे-पाटील कुटुंबियांचे नाते किती घट्ट आणि त्यांच्याप्रती मायेचा ओलावा किती अफाट आहे, याची प्रचिती नुकतीच जवळा येथील नागरिकांना आली.
पापामियां खलिफा हे जवळा गावचे अत्यंत गरीब व मुस्लिम समाजातील नाभिकाचा व्यवसाय करणारे रहिवाशी, गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या चावडी कट्यावरुन जवळा गावाचा कारभार चालायचा त्याच चावडी कट्ट्याच्या शेजारी पापामियांचे सलूनचे दुकान होते. आपल्या दुकानातून त्यांनी गावाचा कारभार कसा चालतो हे थोरले पाटील (अण्णासाहेब), धाकटे पाटील (बाबासाहेब), घुले सरकार (अण्णासाहेब), भिमरावकाका साळुंखे, गुरुबाळ स्वामी,आयुबशहा इनामदार, गुण्याबा नाना यांच्या सोबतीने जवळून पाहिला.गावातील प्रत्येक महत्वाच्या घटनेचे ते साक्षीदार राहिलेले आहेत. गावाच्या पंचायतीत होणाऱ्या न्यायनिवाड्यामध्ये पापामियांनी इतर पंचाच्या सोबतीने महत्त्वाचे योगदान दिले होते. सध्या त्याकाळातील पंचापैकी फक्त पापामियांचं हयात आहेत, परंतु वाढत्या वयामुळे गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आपला सलूनचा व्यवसाय बंद केला होता. सध्या ते तब्बल 97 वर्षांचे आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याने सध्या ते विश्रांतीसाठी आपल्या जवळा गावातील मुलाच्या वस्तीवर मुक्कामासाठी राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वयामुळे ते समोर येणाऱ्या व्यक्तींना ओळखू शकत नाहीत. त्याचबरोबर येणाऱ्या व्यक्तींशी ते बोलूही शकत नाहीत. म्हणजेच वाढत्या वयामुळे त्यांची वाचा गेलेली आहे. वयाची शंभरी गाठल्याने पापामियां अंथरूणावरच खिळून आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सेवा त्यांची सून आणि नातवंडे करीत आहेत. अंथरुणावर खिळून असलेल्या पापामियांची प्रकृती अत्यंत खालावल्याचे समजताच, गेल्या अनेक पिढ्यांपासून साळुंखे-पाटील कुटुंबीयांशी जिव्हाळा असणाऱ्या पापामियांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या समोर असलेल्या सर्व लोकांना थांबवून आणि समोरील कामे बाजूला ठेऊन पापामियांसाठी एक मायेची शाल आणि खाण्यासाठी फळे घेऊन थेट पापामियांची वस्ती गाठली. अगदी अनपेक्षितपणे समोर काकासाहेबांचे चिरंजीव दिपकआबांना पाहताच अनेक दिवसांपासून अंथरुणावर पडून असलेले 97 वर्षांचे पापामियां ताडकन उठून बसले.
यावेळी समोर आलेल्या दिपकआबांनी सोबत आणलेली मायेची शाल पापामियांच्या अंगावर टाकली. यावेळी दिपकआबांना पाहून स्मृती कमी झालेली असताना व वाचा गेल्याने बोलू न शकणाऱ्या पापामियांना गहिवरून आले आणि अगदी अनपेक्षितपणे पापामियां दिपकआबांशी बोलू लागले.अनेक वर्षांपासून शांत असणारे पापामियां अचानक सामान्य माणसाप्रमाणे आबांशी बोलू लागले. आबांशी गप्पा मारतांना अनेक जुन्या घटना व साळुंखे-पाटील कुटुंबियांशी पापामियांच्या जोडलेल्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी भावनिक झालेल्या पापामियांना दिपकआबा भेटायला आल्याने गहिवरून आले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते.
सामान्य माणसाचा साळुंखे-पाटील कुटुंबियांसमवेत असलेला मायेचा हा अनोखा जिव्हाळा पाहून पापामियांशी बोलताना दिपकआबांचे डोळेही नकळतपणे पाणावले होते.दिपकआबा आणि पापामियां यांच्यात तब्बल तासभर संभाषण सुरू होते.गेल्या काही वर्षांपासून एकही शब्द न बोललेले पापामियां दिपकआबांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारतांना पाहून पापामियांची सून आणि नातवंडांनाही आश्चर्य वाटले. या हृदयस्पर्शी प्रसंगी उपस्थित असलेल्या खलिफा कुटुंबीय व इतर नागरिकांनाही हा प्रसंग पाहून अक्षरशः गहिवरून आले होते.
आपल्या गावातील व आपल्या कुटुंबाशी गेल्या अनेक पिढ्यापासून संबंधित असलेल्या समाजातील एका दुर्लक्षित घटकाची, त्याच्या सुखदुःखाची, भल्या-बुऱ्याची इतक्या बारकाईने नोंद ठेवून अडचणीच्या काळात अशा लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याच्या स्वभावामुळे किंवा संस्कारांमुळेच आज साळुंखे-पाटील कुटुंबियांशी सांगोला तालुक्यातील हजारो लोकांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. याचा प्रत्यय वेळोवेळी विविध घटनातून येतो. अत्यंत सामान्य परिवारातील नाभिक व्यवसाय करणाऱ्या पापामिया खलिफा यांची अनपेक्षितपणे भेट घेऊन दिपकआबांनी त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना मायेने आधार दिला. या घटनेवरूनच साळुंखे-पाटील कुटुंबियांचे सामान्य नागरिकांशी किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत किंवा जनसामान्यांत साळुंखे-पाटील कुटुंबाच्या मायेचा ओलावा किती खोलवर रुजला आहे. हेच अधोरेखित होते.
0 Comments