महाविकास आघाडीच्या धोरणाला मोहोळ तालुक्यात हरताळ



सत्तेच्या सारीपाटात राष्ट्रवादीची सरशी
शिवसेनेची 'एकला चलो रे ' ची भूमिका
डोंगरे-महाडिकांच्या माध्यमातुन भाजपही सक्रीय
घडयाळाचे काटे आणि सेनेचा बाण
भाग १
मोहोळ (साहील शेख):- तीन विविध पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा कारभार सध्या कसाबसा सुरू झाला आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे या तिन्ही पक्षांनी मिळून भाजपला पद्धतशीर सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सुरुवातीला स्थापन झालेल्या महाशिवआघाडी असे बारसे झालेल्या आघाडीचे नंतर नामांतरण होऊन महाविकास आघाडी असे झाले. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातही विधानसभेपूर्वी भाजपने राष्ट्रवादीला एका पाठोपाठ एक असे पक्ष प्रवेशाचे हादरे देत अनेक दिग्गजांना आपल्या तंबूत ओढून घेतले सध्या जि.प. अध्यक्ष पदाचे बिगुल वाजल्यानंतर भाजपला काहीही करून अध्यक्षपद मिळू द्यायचे नाही असा पवित्रा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींनी घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सध्याचे प्रमुख मार्गदर्शक राजन पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली शरदचंद्र पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार सर्व पक्षांना चालेल असा उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी द्यावा असे राष्ट्रवादीकडून संकेत देण्यात आला. याबाबत महाविकास आघाडी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठकही झाली.
एकेकाळी पवारांचे निकटवर्तीय समर्थक असलेले व राष्ट्रवादी पासून दूर गेलेले दिलीप सोपल सध्या शिवसेनेत आहे.तर काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेले दिलीपराव माने यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. मात्र आलेल्या राजकीय वादळातही राष्ट्रवादीच्या निष्ठेवर भरोसा ठेवून असलेल्या राजन पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्यासोबतच सदैव राहणे पसंत केले. त्यामुळे जिल्ह्यातील इतर राष्ट्रवादीमध्ये असलेल्या नसलेल्या नेत्यांपेक्षा राजन पाटील यांच्या निर्णय प्रक्रियेवर शरदचंद्र पवार यांचा ठाम विश्वास आहे. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या राजकारणाच्या निमित्ताने पाटील -माने आणि सोपल तिन्ही नेते एका ठीकाणी आले. सोशल मीडियावर या तीनही नेत्यांच्या एकत्रित प्रतिमा झळकल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातही महाविकास आघाडीचे राजकारण सक्रिय झाल्याची जाणीव सर्वांना झाली. मात्र मोहोळ तालुक्याच्या राजकारणात अद्यापही महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मनोमीलन म्हणावेत तशा प्रमाणात झाल्याची एकही बाब निदर्शनास आली नाही. त्याला कारणही तसेच आहे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांनी कडवी झुंज देत राष्ट्रवादीला विधानसभेला आव्हान दिले. मात्र राष्ट्रवादीने यशवंत माने यांच्यासारख्या नव्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला विजयी करत शिवसेना आणि भाजपचा तब्बल वीस हजार मतांच्या फरकाने अत्यंत नामुष्कीजनक पराभव केला.
शिवसेना-भाजप व राजन पाटील यांना वैयक्तिक विरोध करणाऱ्या अनेक छुप्या गटांनी या वेळी राजन पाटील यांचा पराभव करायचाच असा चंग बांधला होता. मात्र राजन पाटील यांनी नेहमीप्रमाणे विरोधी पक्षातील सुप्तावस्थेत असलेल्या अनगर समर्थकांना भावनिक आवाहन करत पुनश्च विधानसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला.त्यामुळे मोहोळ या विधानसभा मतदारसंघात राजन पाटील यांच्या राष्ट्रवादीचा वरचष्मा आजही असल्याची बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली.
अकलुजकर मोहिते पाटलांनी म्हणजे मुलगा जरी भाजपमध्ये असला तरी मी अजुन राष्ट्रवादी सोडली नाही असे विधान करून त्यावेळी जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्याच धर्तीवर शेटफळकर असलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे यांचे सुपुत्र विजयराज डोंगरे हे त्यांच्या समर्थकांसह सध्या जरी भाजपमध्ये सक्रिय असले तरी मनोहर डोंगरे आजतागायत कधीही भाजपच्या व्यासपीठावर न गेल्याने येत्या काळात काय त्यांची भूमिका काय याबद्दलही उत्सुकता आहे. तर शिवसेनेचे बाणेदारपणे नेतृत्व मानणाऱ्या मोहोळ शिवसेनेचीही राष्ट्रवादी बद्दलची भूमिका कट्टर विरोधाची आहे. मोहोळमध्ये येऊन तानाजी सावंत यांनी 'अनगरकरांना विकत घेऊ शकतो ' या धाडसी दाव्याचे केलेले भाषण अजूनही राष्ट्रवादीमधील समर्थक विसरले नाहीत. त्यानंतर जिल्ह्याच्या शिवसेनेत ना सावंत सक्रीय दिसले ना मोहोळच्या राजकारणात त्यांचे त्यावेळचे समर्थक दिसले. सावंतांच्या समर्थक असलेल्या पदाधिकाऱ्यांची पदे रातोरात गायब झाली. त्यामुळे राज्यात जरी महाविकास आघाडीच्या ताटात अनेक पक्षाच्या वाट्या एकत्र आल्या असल्या तरी या वाटया भविष्यात मोहोळ तालुक्याच्या राजकारणाच्या ताटात एकमेकांवर आदळल्या शिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की.
0 Comments