महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीच्या त्रुटी दूर कराव्यात समाज कल्याण विभागाचे आवाहन

सोलापूर, (कटूसत्य. वृत्त.): जिल्ह्यातील सन 2018-19 व 2019-20 या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेंतर्गत महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. मात्र बँक खाते क्रमांक चुकीचा असणे, बँक खात्याला आधार संलग्नित नसणे, बँक खाते निष्क्रिय असणे या त्रुटी आढळून आल्या आहेत. याची त्वरित पूर्तता महाविद्यालयांनी करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.
याबाबत वारंवार महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्राद्वारे, बैठकीत कळवूनही त्रुटी दूर करण्यात आल्या नाहीत, याची दखल समाज कल्याण आयुक्तांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या त्रुटी दूर करून पुल अकाऊंट (Pending At PFMS Application) मधील प्रलंबित अर्ज विहीत कालावधीमध्ये निकाली काढावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
विहीत कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना देय शिष्यवृत्ती आदा करण्यास झालेला विलंब व विद्यार्थी शिष्यवृत्ती शुल्क माफीच्या लाभापासून वंचित राहिल्यास अथवा शिष्यवृत्ती/ शुल्क माफीची रक्कम विद्यार्थ्यांना न मिळाल्यास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल, यांची गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथा महाविद्यालयाविरुद्ध प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्याचा इशारा, श्री. आढे यांनी दिला आहे.
0 Comments