ध्वजनिधीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांचे आवाहन
सोलापूर, (कटूसत्य. वृत्त.): ध्वजनिधीचा वापर सैनिक, माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या पाल्यासाठी केला जात असल्याने संकलनासाठी प्रत्येक नागरिकाने खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त 2020 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात श्री. स्वामी बोलत होते. यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजित देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, 38 एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजेश गजराज, निवृत्त कर्नल हरी बोंगे, माजी सैनिक कल्याण कार्यालयातील एम.के. दाभाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
श्री. स्वामी म्हणाले, जवान सीमेवर अहोरात्र पहारा देत देशाच्या सीमांचे रक्षण करतो तर शेतकरी धान्य पिकवितो. दोन व्यक्तीवर देशाचे भवितव्य आहे. दोघांच्याही प्रती आदर बाळगा. सैनिकांच्या कुटुंबाबद्दल प्रत्येकांनी आदर आणि सन्मान व्यक्त करायला हवा. निधी संकलनात जिल्हा परिषदेचा सर्वात जास्त वाटा आहे, हे अभिनंदनीय आहे. यंदा दोन कोटींचे उद्दिष्ट घेऊन प्रत्येक विभागाने 100 टक्के हिस्सा द्यावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. माजी सैनिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नल गजराज म्हणाले, देशासाठी बलिदान देणारे आणि सध्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांचा दिवस आहे. त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करायला हवे. मुलांना सैन्याची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील आहे.
निवृत्त कर्नल बोंगे म्हणाले, निवृत्तीनंतर माजी सैनिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्हा सैनिक कार्यालयाने माजी सैनिकांसाठी योजना करताना ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. ध्वजनिधीची मदत वाया न जाता ती मार्गी लागते, याचे समाधान आहे.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वात जास्त ध्वजनिधी संकलन करणाऱ्या कार्यालयांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
सर्वात जास्त 44 लाख 83 हजार 792 ध्वजनिधी संकलन करणारे कार्यालय जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, 40 लाख 47 हजार 432 रूपये माध्यमिक शिक्षणाधिकारी, पोलीस आयुक्त कार्यालय, महानगरपालिका आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन), निवासी उपजिल्हाधिकारी, मुद्रांक जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक,राज्य राखीव पोलीस बल, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, अधिष्ठाता, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, विभागीय नियंत्रक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास, महावितरण ग्रामीण विभाग, सोलापूर जनता बँक यांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आली.
प्राथमिक शिक्षण विभागाचे लिपीक धनंजय जगताप आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे वरिष्ठ लिपीक एस.पी. बारबोले यांचा विशेष प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दिवाळीमध्ये सीमेवर सैनिकांना मिठाई पाठविणाऱ्या नेहा आणि नागेश मिरजगावकर यांचाही सन्मान करण्यात आला.
हवालदार राजेंद्र सोमनाथ जगदाळे चीन सीमेवर शहीद झाले होते. त्यांना राज्य शासनाकडून एक कोटींची आर्थिक मदत दिली जाते, त्यातील राहिलेल्या 50 लाखांचा धनादेश वीर पत्नी ज्योती जगदाळे आणि वीर माता ताराबाई जगदाळे यांना श्री. स्वामी यांच्या हस्ते देण्यात आला.
माजी सैनिक श्रीकांत तानवडे यांचे पाल्य आशिष यांना परदेशी शिक्षणासाठी 50 हजार, माजी सैनिक जयवंत तळेकर यांचे पाल्य नम्रता यांना 40 हजारांचा धनादेशही देण्यात आला.
2019 चे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजित देशमुख यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले स्मृतीचिन्ह श्री. स्वामी यांच्या हस्ते देण्यात आले.
राज्य शासनाने 2019 ला सोलापूर जिल्ह्याला 1 कोटी 49 लाख 41 हजार रूपयांचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी 1 कोटी 73 लाख 71 हजार 960 रूपयांचे निधी संकलनाचे उद्दिष्ट 116 टक्के पूर्ण केले आहे. 2020 वर्षासाठी जिल्ह्याला 1 कोटी 49 लाख 41 हजार रूपयांचे उद्दिष्ट दिले आहे.
0 Comments