ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना 30 लाख रुपये विकास निधी देणार - आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला (कटूसत्य. वृत्त.): सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह सांगोला तालुक्यातील 61 व पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील 13 असे सांगोला विधानसभा मतदारसंघातील एकूण 74 गावांची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरावयाची प्रक्रिया सुरू होणार आहे व 15 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीर झालेल्या सर्व ग्रामपंचायत येथील नागरिकांना निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचे आवाहन केले आहे व जी गावे निवडणूक बिनविरोध पार पाडतील त्या गावांच्या विकासाकरिता 30 लाख रुपये विकास निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुका अनावश्यक खर्च टाळून करणे व गावांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकांमध्ये कटुता निर्माण होऊन गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडून राजकीय वितुष्ट निर्माण होऊ नये यासाठी गावातील जेष्ठ व जाणकार मंडळींनी तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी एकत्र येऊन गावाचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न करावा यासाठी जी गावे या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणूक पार पाडतील त्या सर्व गावांना विविध विकास कामांकरिता प्रत्येकी तीस लाख रुपये निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे.
0 Comments