सांगोला नगरपरिषदेकडुन बँकांच्या मदतीने 'पीएम स्वनिधी' योजनेअंतर्गत 17 पथविक्रेत्यांच्या खात्यावर प्रत्येकी 10,000 रुपयांच्या कर्जाचे वितरण

आजअखेर एकूण 121 पथविक्रेत्यांच्या खात्यावर एकूण 12.10 लाख जमा
सांगोला (कटूसत्य. वृत्त.): लॉकडाऊन काळात मोडकळीस आलेल्या पथ विक्रेत्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू होऊन त्यांची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसावी, या उद्देशाने सुरू केलेल्या केंद्र पुरस्कृत "पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी( पीम स्वनिधी)" योजनेची शहरात सांगोला नगरपरिषदेकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत आज 17 पात्र पथविक्रेत्यांना व आजअखेर एकूण 121 पथ विक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जात असून शहरातील जास्तीत जास्त पथ विक्रेत्यानी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे व लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांनी केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या साहाय्याने सांगोला नगरपरिषद सभागृहात या योजनेच्या 17 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करताना ते बोलत होते.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन काळात डबघाईस आलेल्या पथ विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता (आत्मनिर्भर निधी) या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पथ विक्रेत्यांना विशेष सूक्ष्म पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बँकेच्या सहाय्याने अशा पथ विक्रेत्यांना विनातारण दहा हजार रुपये खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे. या पथविक्रेत्यांमध्ये भाजी,फळे, चहा, कापड विक्रेते, टोपल्या बनविणारे छोटे व्यावसायिक,तयार खाद्यपदार्थ, भजी वडापाव, अंडी, चप्पल, पुस्तके, स्टेशनरी, केशकर्तनालय, चर्मकार, पान दुकान, लॉंड्री दुकान यांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महा ई सेवा केंद्रातून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. दि.18 डिसेंम्बर 2020 अखेर सांगोला शहरातील सुमारे 228 शहरी फेरीवाल्यांनी अर्ज केले होते त्यापैकी 156 व्यक्तींचे अर्ज प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ़ इंडिया, स्टेट बँक ऑफ़ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला यांनी मंजूर करून त्यापैकी 121 लाभार्थीच्या खात्यात दहा हजार रुपये प्रमाणे 12.10 लाख रुपये एवढी कर्ज रक्कम जमा करण्यात आलेली आहे.
कर्जाची नियमित परतफेड केल्यास सात टक्के व्याजात सूट व पुढे मोठे भांडवली कर्ज देण्यात येईल तसेच लाभार्थीने डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक ऑफर देखील दिली जाणार आहे. या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक सुजित कुमार, सांगोला नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, सहा. प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे व नगरपरिषद कर्मचारी देखील उपस्थित होते. उपस्थित पथविक्रेते व सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
जास्तीस जास्त पथविक्रेत्यांनी योजनेचा लाभ घेऊन आपल्या सहकारी पथविक्रेत्यांना ही या योजनेची माहीती देण्याचं व या योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत करावी. - सौ.राणीताई माने (लोकनियुक्त नगराध्यक्षा, सांगोला नगरपरिषद)
'पीम स्वनिधी योजना' ही कोरोना काळामध्ये व्यवसाय मोडकळीस आल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या छोट्या पथविक्रेत्यांसाठी नवसंजाविनी देणारी योजना आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. - कैलास केंद्रे (मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद)
0 Comments