अरुण लाड आणि जयंत आसगांवकर यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री आज सांगोल्यात ; महाविकास आघाडीची उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सांगोल्यात बैठक
सांगोला : - पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण (अण्णा) लाड आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीसाठी आज शनिवार दि 21 रोजी दुपारी 4 वा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. दत्तात्रय भरणे सांगोल्यात उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शनिवारी दु. 4.00 वाजता शहरातील कविराज मंगल कार्यालय येथे बैठक आयोजित केली आहे. अशी माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या नेतेमंडळींनी एकदिलाने व एकजुटीने पायाला भिंगरी लावून संपूर्ण पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. दररोज पुणे मतदारसंघातील वेगवेगळ्या तालुक्यात बैठका आयोजित करून पुणे पदवीधरचे अरुण (अण्णा) लाड आणि शिक्षकचे जयंत आसगांवकर यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. याच झंझावाती प्रचाराचा एक भाग म्हणून आज शनिवारी सांगोला येथे महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सांगोला येथे आयोजित बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. दत्तात्रय भरणे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, तसेच सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार गणपतराव देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम दिपकआबा साळुंखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा प्रबुद्धचंद्र झपके आदींसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. तरी सांगोला शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, व पदवीधर तसेच शिक्षक मतदार बंधू-भगिनींनी या बैठकीसाठी वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments