Hot Posts

6/recent/ticker-posts

महिला सक्षमीकरणासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी

महिला सक्षमीकरणासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी

सोलापूर (क.वृ.):- राष्ट्राच्या विकासामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे.  मात्र अजूनही काही क्षेत्रात महिलांना समान श्रेय किंवा स्थान दिले जात नाही. राष्ट्रविकासात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा व महिलांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी, असे मत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विशेष वेबिनारमध्ये सहभागी वक्त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सुचनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातर्फे राष्ट्रीय एकात्मता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी, विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातर्फे विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. 'राष्ट्रविकासात महिलांचे योगदान' हा या वेबिनारचा विषय  होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या.  प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, चित्रपट निर्मात्या  सायली जोशी यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. देबेंद्रनाथ  मिश्रा,  कुलसचिव प्रा. डॉ. व्ही. बी.  घुटे , अधिष्ठाता डॉ. विकास कदम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक  प्रा. डॉ.  गौतम कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वेबिनारचे  समन्वयक डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी करून दिला. 

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक सातपुते म्हणाल्या की, माझे वडील इयत्ता अकरावीपर्यंत शिकले होते, पण त्यांनी लग्नानंतर आईची शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण केली. माझ्या आईने शिक्षण घेतल्यामुळे आमच्या कुटुंबाची प्रगती झाली. मला मनासारखे शिकता, जगता आले.  इतर बहिणीपेक्षा मी जास्त शिकले.  प्रत्येक कुटुंबात महिलांची भूमिका महत्त्वाची असते.  घरामध्ये मुलगा व मुलीला समानतेची वागणूक द्यायला हवी.  घरात समानता निर्माण झाल्यावर समाजातही आपोआप समानता निर्माण होते.  देशाच्या विकासात महिला सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात योगदान  देत आहेत. राष्ट्रविकासात त्यांचे आणखी योगदान वाढवण्यासाठी महिलांना सक्षम करण्याची व तसे वातावरण उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे. देशाला सर्वच क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या माणसांची गरज आहे.  राष्ट्राचा विकास होण्यासाठी चित्रपट, क्रीडा, शिक्षण, कृषी, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, पोलीस, प्रशासन आदी सर्व क्षेत्रात चांगल्या माणसांची गरज आहे, असे मतही सातपुते यांनी यावेळी व्यक्त केले.

चित्रपट निर्मात्या जोशी म्हणाल्या की, चित्रपट क्षेत्रात पुरुषांचीच मक्तेदरी होती. आता मात्र चित्रपट क्षेत्रातही महिलांनी मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात महिलांना उज्वल भविष्य दिसून येत आहे. पुरुष कलाकारांपेक्षा महिला कलाकारांची कष्ट करण्याची तयारी जास्त  असल्याचे दिसून येते.  महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता येईल असे वातावरण कुटुंबातील व्यक्तींनी तयार करून दिले पाहिजे.  जेथे महिलांचा आदर केला जातो तेथेच राष्ट्रविकासाला चालना मिळू शकते.  महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. 

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की,  राष्ट्राच्या विकासात  महिला मोठ्या प्रमाणात व पुरुषांच्या बरोबरीने योगदान देत आहेत. असे असले तरी समान स्थान व समान वेतन मिळताना दिसत नाही.  स्त्रियांना कमी लेखण्याची समाजाची मानसिकता अजून संपलेली नाही. ही मानसिकता जेव्हा संपेल तेव्हा स्त्रियांना विकासाचे खुले आकाश उपलब्ध असेल. महिलांचा सर्वांगीण विकास व राष्ट्रविकासात त्यांचा अधिकाधिक सहभाग वाढावा हाच एकता सप्ताहाचा हेतू आहे. स्त्रियांनी स्वतःच्या प्रश्नांना स्वतःच उत्तर शोधायला शिकले पाहिजे. स्वतःच्या क्षमतांची  वाढ करायला हवी.  पारंपरिक सामाजिक अडथळे व बंधने झुगारून द्यायला हवेत. एका  सर्वेक्षणानुसार  मुलींच्या जन्माचा आनंद केवळ 40 टक्के लोकांनाच झाल्याचे निष्पन्न झाले. समाजाची ही मानसिकता बदलायला हवी. उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांचे प्रमाण तुलनेत अत्यंत कमी आहे. मोजक्याच वर्गातील महिला उच्चशिक्षण घेऊन पुढे  गेलेल्या दिसून येतात. उच्चशिक्षणासाठी महिलांना तसे वातावरण तयार करून दिले पाहिजे. आरोग्य क्षेत्रातही महिलांचा सर्वात जास्त सहभाग आहे. मात्र तेथे त्यांना समान वेतन मिळत नाही. विदयापीठात महिला अभ्यास केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न असून महिलांच्या विकासासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे कॅपॅसिटी बिल्डींग फॉर वुमेन मॅनेजर हा अभ्यासक्रम चालविला जात आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. अंबादास भासके  यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments