विधानपरिषदेच्या सर्व जागा भाजपा जिंकणार - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील


सांगोल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
सांगोला (क.वृ.): पदवीधर आमदार असताना बारा वर्षाच्या काळात अनेक कामे मार्गी लावली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता जेरीस आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करण्यात यशस्वी झाले पण, प्रत्यक्षात मदत करण्यात अपयश आल्याने शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागली. राज्यात महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. शाळा सुरू करण्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. विधानपरिषदेच्या सर्वच जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे. ही निवडणूक म्हणजे ये तो झाकी है, आगे और लढाई बाकी है असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे मेळावा पार पडला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, तालुकाध्यक्ष, चेतनसिह केदार-सावंत, मोहन डांगरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नगराध्यक्षा राणी माने, संभाजी आलदर, गजानन भाकरे, शिवाजीराव गायकवाड, डॉ.जयंत केदार, राजश्री नागणे, रासपचे सोमा मोटे, रयत क्रांती संघटनेचे भारत चव्हाण, विनायक कुलकर्णी, शितल लादे, वैजयंती देशपांडे, एन वाय भोसले, संजय गंभीरे,शिवाजी शेजाळ,तानाजी कांबळे, माणिक सकट, शिवाजी ठोकळे, देविदास कांबळे, मानस कमलापुरकर, ओंकार कुलकर्णी, प्रसाद फुले, प्रवीण जानकर, अनिल केदार, संजय केदार, दीपक केदार, राहुल केदार, गणेश केदार, प्रवीण नवले, सोयजित केदार, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, नागपूर, मराठवाडा व पुणे पदवीधर, अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अटीतटीची लढाई आहे.12 वर्षाच्या काळात पदवीधर आमदार असताना अनेक कामे मार्गी लावली. भाजप सरकारच्या काळात 50 हजार शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावला. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले. धनगर समाजासाठी 22 योजना सुरू केल्या. संपर्कासाठीची ही निवडणूक असून कॉग्रेसवाल्या सारखी आरोप करण्यासारखी निवडणूक नाही.
माझं नाव घेतल्याशिवाय काँग्रेसच्या नेत्यांना झोप लागत नाही. त्यांना झोपेच्या गोळ्याऐवजी चंद्रकांत पाटील हे नाव घ्या असा सल्ला डॉक्टरांनी विरोधकांना दिला आहे. ऊर्जामंत्र्यांनी 100 युनिट पर्यंत वीज बिल माफीची घोषणा केली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. सत्ताधाऱ्यांच्या क्रेडिट घेण्याच्या नादात जनता संकटात सापडली असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. यावेळी प्रस्ताविक करताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, सांगोला तालुक्यात 38 हजार भाजपच्या कार्यकर्त्यांची सदस्य नोंदणी केली. 2300 पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे. टेंभू व म्हैसाळ या योजनांना निधी भाजपच्या सरकारने दिला. भाजप सरकारने दिलेल्या निधीच्या जोरावर तालुक्यातील टेंभू व म्हैसाळ योजना मार्गी लागल्या. भाजपने केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी तालुक्यातील इतर पक्षाच्या नेत्यांची पाण्याचे जलपूजन करण्यासाठी धावपळ सुरू होती.
व्हर्चुअल रॅलीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या सरकारने दिलेल्या निधीमुळेच सांगोला तालुक्यातील सिचन प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र विरोधकांनी जलपूजन करणे बंद केले. भाजप सरकारने सांगोल्याला भरभरून दिले. यापुढील काळात सांगोला तालुका भाजपचा राहणार असल्याचे चेतनसिह केदार सावंत यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भाकरे यांनी केले. प्रारंभी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
0 Comments