निर्यातक्षम फळबागांची ग्रेपनेटद्वारे नोंदणी करा कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर, दि.१३(क.वृ.): किडनाशक उर्वरित अंश व किड रोगांची हमी देण्यासाठी हॉर्टिनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. जिल्ह्यातील निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांनी 2020-21 करिता नोंदणी/ नूतनीकरण कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून त्वरित अर्ज करून आपल्या प्लॉटची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
सन 2019-20 मध्ये सोलापूर जिल्ह्यातून 2910.70 हेक्टर क्षेत्रावर 3880 फळबाग व भाजीपाला प्लॉटची नोंदणी झालेली आहे. 2020-21 साठी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीसाठी युरोपियन युनियन व इतर देशांनाही नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. अर्जासोबत विहीत नमुन्यातील अर्ज, सातबारा उतारा, आठ अ उतारा, बागेचा नकाशा व आवश्यक नोंदणी फी आवश्यक आहे.
नोंदणी करण्याची मुदत खालीलप्रमाणे :
द्राक्ष पिकासाठी ऑनलाईन नोंदणीचा कालावधी ऑक्टोबर 2020 ते नोव्हेंबर 2020, नोंदणी शुल्क 50 रुपये प्रति 1.20 हेक्टर क्षेत्रासाठी, विलंब शुल्क ऑनलाईन नोंदणीचा कालावधी नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2020, नोंदणी शुल्क 100 रुपये प्रति 1.20 हेक्टर क्षेत्रासाठी, आंबा पिकासाठी ऑनलाईन नोंदणीचा कालावधी डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 असा आहे. डाळिंब पिकासाठी ऑनलाईन नोंदणीचा कालावधी ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021, भाजीपाला आणि लिंबूवर्गीय पिकासाठी ऑनलाईन नोंदणीचा कालावधी वर्षभर सुरु असून काढणीच्या अगोदर 15 दिवस करावी. आंबा, डाळिंब, भाजीपाला, लिंबूवर्गीय पिकांना नोंदणी शुल्काची आवश्यकता नाही.
0 Comments