फेरीवाले , पथविक्रेत्यांची आत्मनिर्भरता कागदावरच


राष्ट्रीयीकृत बँका आणि नगरपरिषद प्रशासनात असमन्वय
मोहोळ दि.१६(क.वृ.): लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना आणली . मात्र , अजून तरी राष्ट्रीयकृत बँकाकडून या योजनेतून लाभ दिला जात नाही . पथ विक्रेत्यांसाठी सुरू केलेली ही योजना अजूनही कागदावरच आहे . या योजनेचे आम्हास निर्देश नाहीत . अशी काही योजना नाही . अशी मोघम उत्तरे देऊन बँकाकडून पथ विक्रेत्यांना थेट कर्जास नकार दिला जात असल्याचे वास्तव आता पुढे आले आहे . या योजनेत नगरपरिषदेचा मोठा भाग आहे . परंतु अद्याप नगरपरिषदेकडून सुद्धा या योजनेसाठी म्हणावा तसा वेग आला नसल्याने तीन महिने होऊन सुद्धा योजना अजून कागदावरच आहे . मोहोळ शहरात जवळपास अडीच ते तीनशे नोंदणी नसलेले विक्रेते आहेत . योजना नवीन आहे , त्यामुळे बँक अधिकारी , अग्रणी बँकेचे अधिकारी , नगरपरिषद व लाभार्थी यांच्यात समन्वय साधून ही योजना प्रगती पथावर आणण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे .१७ जून रोजी ही योजना अस्तित्वात आली . प्रारंभीच्या काळात कोल्हापूर व सांगली येथे पायलेट प्रोजेक्ट म्हणून ही योजना राबवली त्यास चांगला प्रतिसाद मिळाला . त्या धर्तीवर आता सोलापूर महानगरपालिका व जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपालिकेत ही योजना राष्ट्रीय कृत बँक व शासन यांच्या मदतीने राबविण्याचे केंद्र सरकारने निर्देश असून राष्ट्रीयकृत बँकांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत .यासाठी अग्रणी बँक समन्वयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे . ज्यांची नगरपरिषदेकडे नोंदणी नाही . अशानाही या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे .
आत्मनिर्भर म्हणजे काय ? कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते . या काळात पथ विक्रेत्यांचे व्यवसाय बंद होते . त्यामुळे पथ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली . त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची घोषणा केली . हा आदेश १७ जून २०२० रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका , नगरपालिका आणि बँकांना पाठविण्यात आला . या योजनेतून छोटया व्यावसायिकांना १० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे . योजना कोणासाठी ? महानगरपालिका , नगरपालिकांचे विक्री प्रमाणपत्र असलेल्या पथ विक्रेत्यांना कर्ज मिळणार आहे . महानगरपालिका , - नगरपालिकांच्या सर्वेक्षणात आढळलेल्या विक्रेत्यांनाही ही योजना लागू करण्यात आली आहे . कर्जासाठी मोहोळ नगर परिषद यांची शिफारस मात्र आवश्यक ठरणार आहे .
0 Comments