कोट्यवधींचा टोळ देऊनही मोहोळ-पंढरपूर महामार्गावर दररोज तुंबतेय घाण पाणी..
मोहोळ ( साहिल शेख ):- मोहोळ शहराच्या उड्डाणपुलाच्या हॉटेल लोकसेवा पंढरपूर रस्त्यावर पुरेशी ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी तब्बल सात ते आठ फूट खोल पाणी साठत आहे. सदरचे पाणी अत्यंत घाण गटारीचे व ड्रेनेजचे साठत असल्याने त्यामधूनच सोलापूर कडून पंढरपूर कडे जाणारी वाहने मार्गस्थ होतात. सध्या या गटारीच्या व ड्रेनेजच्या घाण पाण्यातूनच पायी जाणाऱ्या विद्यार्थी व अबालवृद्धांना मार्गस्थ व्हावे लागत आहे. या भागात बँका व इतर महत्त्वाचे व्यवसायाची दुकाने असल्याने शहरवासीयांचे पाय गटार आणि ड्रेनेजच्या पाण्यात मलीन करून जावे लागत आहे. हे या महामार्ग बांधकाम विभागाचे आणि शहरवासीयांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
घाणीतुन जाणाऱ्या या महामार्गाच्या त्रासाबद्दल प्रचंड संतापाची लाट शहरवासीयातून व्यक्त केली जात आहे. हलगर्जीपणाची भूमिका कायम ठेवली. कोट्यवधी रुपयांचा टोल घेणाऱ्या महामार्ग प्रशासनाला वाहनधारकांचा हा त्रास का बर दिसत नाही ? असा संतप्त सवाल शहर व त्यातून व्यक्त केला जात आहे.किमान आतातरी महामार्ग बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यामधून काही बोध घेतील का असा संतप्त सवाल मोहोळ शहरवासीयांतून विचारला जात आहे. याच पाण्यातून , महसूल, तहसील, पंचायत समिती व आरोग्य प्रशासनाची राजकीय नेते यांची वाहने जाऊनही संबंधित अधिकाऱ्यांना महामार्ग प्रशासनाला सूचना द्याव्या का वाटत नाहीत ? ही बाब देखील विचार करायला लावणारी आहे. टोल नाक्यावरून आपली वाहने मोफत सोडली की खुष होणाऱ्या शहर आणि तालुक्यातील नेतेमंडळींना या गंभीर समस्येचा जाब विचारणे अवघड होऊन बसते. याबद्दल महामार्ग प्रशासनाला थोडी जनाची नाही तर मनाची तर लाज वाटायला हवी अशी भावना मोहोळ शहरवासीयातून व्यक्त केली जात आहे. सदर ठिकाणी असणाऱ्या इमारतींना देखील या साठलेल्या पाण्याचा धोका निर्माण झाला असून इमारती खचून मोठा अनर्थ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काळातील मोठी जीवितहानी होण्याचा अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्रशासनाने सदर साठणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून व शहरवासीयांतून केली जात आहे.
कधीही जीवित होण्याची शक्यता..
जरा जरी पाऊस पडला की चारचाकी वाहने तब्बल निम्म्या भागापर्यंत पाण्यात बुडतात. दरवर्षी देखील मोठ्या वारीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ह्याच घाण पाण्यातून मांडीपर्यंत पाय बुडवून पायी चालत जावे लागते .मोटर सायकल व दुचाकीस्वारांना देखील त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी एखादी गंभीर घटना घडून मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. सदर पाणीसाठते त्या बाजूला महावितरण प्रशासनाची अतिउच्च दाबाच्या वाहिनी देखील आहे .एखादी बस अथवा मोठा पेट्रोल-डिझेल गॅसचा टँकर सदर ठिकाणाहून जातांना रुतून तर कोसळला तर याठिकाणी मोठा स्फोट देखील होण्याची शक्यता आहे. तरीदेखील महामार्ग प्रशासन या गंभीर बाबीकडे पूर्ती डोळेझाक करताना दिसत आहे.
0 Comments